जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

ekanath khadse

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यासह जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात तर तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे उष्माघाताने नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेवर उपाययोजना करण्याबाबत मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती समजून उष्माघाताने मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने पाच लाखांची शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

मृतांच्या परिवारास ५ लाखांची मदत द्या
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सुद्धा ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. उष्माघातापासून संरक्षणासाठी शासनामार्फत वेळोवेळी जनजागृती करून सूचना करण्यात येतात. परंतु शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर आदींना नाईलाजास्तव भर उन्हात काम करावे लागते. अशा परिस्थितीत उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता असते. परंतु सदर नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत पुरविण्यात येत नाही अथवा कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ मिळत नाही. तरी राज्यात उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून, मृतांच्या परिवारास शासनातर्फे कमीतकमी ५ लाख रुपये आर्थिक मदत मिळणेसाठी तत्काळ योग्य ती तरतूद करण्यात यावी ही विनंती करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी appeared first on पुढारी.