जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार

जळगाव : राष्ट्रवादी आंदोलन,www.pudhari.news

जळगाव : येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या कापसाला किमान हमीभाव 15 हजार देण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उभी पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती येणारी पिके वाया गेल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची पिके या पावसाच्या फटक्यातून वाचले आहेत, त्या पिकांना योग्य दर मिळण्याची गरज आहे.

सरकार संयमाचा अंत पाहतेय…

बळीराजा शेतात कष्ट उपसून रात्रंदिवस काम करत आहे. परंतु सरकार मात्र कापसाला कवडीमोल भाव देऊन त्यांची प्रतारणा करीत आहेत. लहरी निसर्गानेही शेतकऱ्यांची हेळसांड केली असून अस्मानीसोबतच सुलतानी संकटाचा सामना ही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, रा.यु.कॉ.जळगाव दिपक पाटील, धवल पाटील, विनायक चव्हाण, मनोज पाटील, सतिष मराठे, अनिल खडसे, शांताराम ठाकूर, लोटू पाटील, राहूल चौधरी, संतोष सपकाळे, बिपीन चौधरी, अंकुश पाटील, सागर पाटील, मंगेश पाटील, चेतन चौधरी, राकेश मराठे, राहुल पाटील, रवींद्र भगत, गौरव पाटील, विजय पाटील, विजय चौधरी, योगेश जाधव, सोपान गाढवे, डिगंबर पाटील, राजू काळे, सीमा फेगडे आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार appeared first on पुढारी.