जळगाव : जळगाव-पाचोरा तिसऱ्या रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव-पाचोरा दरम्यानच्या तिसर्‍या मार्गावर डिझेल इंजिनसह ७ डब्यांच्या ट्रेनची ट्रायल रन १२० किलोमीटर प्रतितास वेगाने घेण्यात येऊन ती यशस्वी ठरली. मध्य रेल्वे विभाग सध्या ९० किलोमीटर प्रतितास वेगाने या मार्गावर रेल्वेगाड्या चालवित आहे. नंतर ११० किलोमीटर प्रतितासापर्यंत वेग वाढविण्यात येणार आहे.

रेल्वेमार्गाची पाहणी नुकतीच मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा व अन्य अधिकार्‍यांनी दोन दिवसांत पूर्ण केली. जळगावापासून अधिकाऱ्यांनी सहा मोटर ट्रॉली गाडीने प्रत्यक्ष रुळांची व पुलांची पाहणी केली होती. अंतिम पाहणी करून त्यांनी कामाच्या बाबतीत काही सूचना केल्या आहेत. दोन दिवसांच्या पाहणीदरम्यान काही निरीक्षणांची नोंद करून त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. पाचोरा ते जळगाव या दरम्यान सात डब्यांची विशेष गाडी डिझेल इंजिन लावून ताशी १२० च्या वेगात चालविण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. या मार्गावरून ताशी ९० च्या वेगात डिझेल इंजिन लावून मालगाड्या चालविण्याच्या सूचना केल्या.

ट्रॅफिक जामची समस्या सुटणार.. 

जळगाव पाचोरा तिसरी लाइन पूर्ण झाली असून, त्यावरील चाचणीसुद्धा यशस्वी झाली असल्याने आता या मार्गावरून मालगाड्या चालविण्यास काही हरकत नाही. मात्र, ही गाडी चालविताना तिचा वेग हा ९० च्या वर जाता कामा नये, अशा सूचना करण्यात आल्या. भुसावळ येथून मुंबईकडे जाणारी मालगाडी पाचोरापर्यंत तिसर्‍या लाइनवरून धावू शकणार आहे. यामुळे मुख्य मार्गावरून धावणार्‍या प्रवासी गाड्यांना आता ट्रॅफिक जॅमचा फटका बसणार.

हेही वाचा:

The post जळगाव : जळगाव-पाचोरा तिसऱ्या रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी appeared first on पुढारी.