जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद

गुंराचा बाजार www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात तब्बल २९ गावात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गाय, बैल यांच्यावर लंपी स्किन डिसीज आजाराने हल्ला चढवला असून सर्व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नुकतेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचित केले आहे.

शेतकऱ्यांचा जोड धंदा म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. मात्र काही दिवसांपासून लंपी स्किन आजाराने थैमान घातले असून जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सर्वच ठिकाणच्या गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. जिल्हातील आठ तालुक्यातील २९ गावात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या आजाराने ग्रस्त जनावरे आढळून आले आहेत. या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या वाहतुकीमुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी हा आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशानुसार पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य मार्केट यार्डवरील गुरांचा आठवडे बाजार ११ सप्टेंबर पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी गुरे-ढोरे विक्रीस आणू नये असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक जी.एच.पाटील, सचिव रमेश चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद appeared first on पुढारी.