जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली

जळगाव,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणातून आवर्तन सोडले जात आहे. याचा परिणाम पूराचे पाणी गावात शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तर गाई-गुरे देखील दगावली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचे उशिराने आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणगाव, पाचोरा, अमळनेर तालुक्याला तर पावसाने चांगलेच झोडपले आहे.

Video : शेवटच्या षटकात २४ धावा ठोकून न्यूझीलंडचा ‘रेकॉर्डब्रेक’ विजय!

अमळनेर तालुक्यात तीन बकऱ्या ठार
अमळनेर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शहरात पिंपळे रस्त्यावर पाणी साचले तर चोपडाई येथे विजेचा शॉक लागून तीन बकऱ्या ठार झाल्या आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. चोपडाई येथे नामदेव राजाराम पाटील यांच्या मालकीच्या या तीन बकऱ्या होत्या. अगोदरच लहरी निसर्गाचा फटका त्यात बकऱ्या देखील ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पाचोरा तालुक्यात दहा गावांची रहदारी ठप्प

पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरात संततधार पावसामुळे तितूर नदीच्या पुलाशेजारी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून गेला. यामुळे दहा गावांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भराव वाहून गेल्याने लोहटार, नाचणखेडा, गाळण, उपलखेडा, धाप, चुंचाळे, पिंपळगाव, गलवाडे, शिंदाड, धनगरवाडी आणि वडगाव या गावांकडे होणारी रहदारी ठप्प झाली आहे.

श्रीगोंद्यात औषध दुकान फोडले

धरणगाव तालुक्यात गाय-बैल ठार
धरणगाव तालुक्यातील पाळधी परिसरातील सतत होणाऱ्या पावसामुळे रेल गावात चार घरांचे धाबे कोसळले. त्यात हितेश रवींद्र पाटील व छोटू दिलीप भिल हे दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घर कोसळल्याने दोन बैल व एक गायही ठार झाली आहे. पावसामुळे गिरणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.

हेही वाचा :

The post जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली appeared first on पुढारी.