Site icon

जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी?

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दि. १० डिसेंबर रोजी मतदान होईल. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दूध संघाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळणार आहे.

जळगाव जिल्‍हा दूध संघाच्‍या संचालक मंडळातील २० संचालक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. १० डिसेंबरला मतदान तर ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत सोमवारी, दि.7 उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पालकमंत्री पाटील यांनी आजवर सहकारात प्रवेश केला नव्हता. मात्र, आता त्यांनी थेट दूध संघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या वतीने प्रतापराव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. दूध संघातील राजकारण आधीच तापले असून आता स्वत: पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने रणधुमाळीला वेग येणार आहे.

सहा वर्षांपासून खडसे गटाचेच वर्चस्व…

जळगाव जिल्हा दूध संघावर मागील सहा वर्षांपासून आ. एकनाथ खडसे गटाचे वर्चस्व आहे. मात्र शिंदे सरकार आल्यानंतर जळगाव दूध संघात अपहार आणि चोरीच्या घटनांबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले. दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाकडून दोघा मंत्र्यांचा कस लागणार आहे. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीही मैदानात उतरणार आहे. तर महाविकास आघाडीचे नेतृत्व खडसे यांच्याकडेच असणार आहे. त्यामुळे ही सत्ता राखण्याचे मोठे आव्हान खडसे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापले आहे.

चोरी अपहाराचं प्रकरण नेमकं काय?

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आहेत. जिल्हा दूध संघातील दूध पावडर तसेच लोणी घोटाळाप्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अपहाराची तक्रार पोलिसात दिली होती. तर एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल केला. या घोटाळ्यात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी? appeared first on पुढारी.

Exit mobile version