जळगाव : नगरसेविका पुत्राला महिलांनी दिला चोप; पोस्ट व्हायरल करणं अंगलट!

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका मुलीचा फोटो एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी संतप्त महिलांनी खडसे समर्थक नगरसेविका पुत्राला भर चौकात चोप दिला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून चौकात मोठी गर्दी झाली होती.

खडसे समर्थक महिला नगरसेविकेच्या मुलाने एका मुलीचे सहलीला गेल्याचे फोटो चुकीचे संदर्भ देऊन सोशल मीडियावर व्हायरल केले होते. मुलीची बदनामी झाल्याने या महिलेनं संतापाच्या भरात मुक्ताईनगर शहरातील मुख्य चौकात या नगरसेविका पुत्रास पकडून चांगलाच चोप दिला. यावेळी हा तरुण आपली सुटका करुन घेण्यासाठी धडपडत होता, मात्र त्याला येथून आपली सुटका करता आली नाही. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक जमले होते.

नागरिकांमध्ये संताप

मुक्ताईनगर येथे आज नगराध्यक्ष पदाची निवड होती. मात्र, न्यायालयाच्या निर्देशांवरून ही निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यातच खडसे समर्थक नगरसेविका पुत्रास ही मारहाण झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुलीचा बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. आम्ही तुम्हाला निवडून देतो, तर आमची काम करण्याऐवजी तुमची मुलं अशी रिकामी काम का करतात? असा संतप्त सवाल चोप देणाऱ्या महिलांनी विचारला.

हेही वाचलंत का ? 

The post जळगाव : नगरसेविका पुत्राला महिलांनी दिला चोप; पोस्ट व्हायरल करणं अंगलट! appeared first on पुढारी.