Site icon

जळगाव : नवजात बालकांची अदलाबदल; संतप्त नातेवाईकांकडून कारवाईची मागणी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन नवजात बालकांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या बालकांचे पालक कोण? असा प्रश्न आता उभा ठाकला आहे. यासाठी पालकांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकरणी रुग्णालयात मोठा वादंग निर्माण झाला असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसुतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय २०, टहाकळी, ता. भुसावळ) आणि प्रतिभा भील (वय २०, कासमपुरा,ता. पाचोरा) या दोन्ही गरोदर महिलांना प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. पाच मिनिटांच्या अंतराने दोघा महिलांचे सिझर करण्यात आले. यातील एका महिलेस मुलगा व दुसऱ्या महिलेस मुलगी झाली. परंतु हे नवजात शिशु त्यांच्या पालकांकडे सोपविताना निरोप देण्यातील गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली.

अर्ध्या तासाने ही चूक उघड होताच प्रसुती कक्षात एकच गोंधळ उडाला. नेमकं कोणतं बालक कुणाचे आहे? हेच समजत नसल्यामुळे दोन्हीकडचे नातेवाईक संतप्त झाले असून, रुग्णालयात वादंग निर्माण झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

नवजात बालकांची आणि मातांची डीएनए टेस्ट करणार…

यावर तोडगा म्हणून रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नवजात बालकांना आपल्या ताब्यात घेतले असून त्यांना नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही बालक आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जीएमसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड यांनी दिली.

अधिक वाचा :

The post जळगाव : नवजात बालकांची अदलाबदल; संतप्त नातेवाईकांकडून कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

Exit mobile version