
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत युवकाकडून वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपयांसाठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. युवकाने पाचोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश मोतीलाल गढरी (३२, रा. आखतवाडे, ता. पाचोरा) यांना शिपाई पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष देत गणेशचे चुलतमामा जगन गंगाराम पवार (रा. मोहलाई, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांचे परिचयातील सागर रतन बागूल (रा. एकलहरे, ता. जि. नाशिक) व एस. पी. बोडखे (रा. डोंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे) यांच्याशी संवाद घडवून आणला. नोकरीच्या आमिषाने दि. १९ मार्च २०२१ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधीत गणेश यांच्याकडून सागर बागूल याने ‘फोन पे’ ॲपवरून वारंवार पैशांची मागणी करत तब्बल ५ लाख २५ हजार रुपये लुटले. त्यानंतरही अद्याप नोकरी लागली नसल्याने गणेश यांनी सागर बागूल व एस. पी. बोडखे यांना नियमित संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बागूल यांचा मोबाइल बंद, तर एस. पी. बोडखे हे ठराविक कालावधीत पैसे देतो. असे सांगत वेळ मारून नेल्याने गणेश यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत बागूल व बोडखे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.
हेही वाचा:
- पुणे : कोर्हाळे-जिंती पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा
- नगर : क्रीडाक्षेत्रात राजकीय मृगजळाचा ‘थर’!
- धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड
The post जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.