जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक

जळगाव: मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मालकाच्या घरातून ५० लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या नोकराला भुसावळ रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिस व आरपीएफने मुद्देमालासह अटक केली. अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे प्रवास करत असताना नोकर मुद्देमालासह पकडला गेला.

मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत (२५, मर्णेया, उमरकट, जि. मधुबनी, बिहार) हा कामाला होता. मालक पत्नीसह बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून राहुलने १९ ऑगस्टला दुपारी घरातील तिजोरी फोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल लांबवला. यानंतर त्याने सूरत गाठले. तेथे शनिवारी थांबवल्यावर राहूलने रविवारी सकाळी उधना येथून अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे प्रवास सुरू केला. दरम्यान, चोरी उघड होताच गांधी यांनी खारघर पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी बिहारकडे पसार होईल, अशी शक्यता वर्तवली होती. यानंतर खारघर पोलिसांनी स्थानिक लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला संशयिताची छायाचित्रासह माहिती पाठवली. ही माहिती मिळताच भुसावळ येथील लोहमार्ग व आरपीएफ यंत्रणा सतर्क झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी २२५६४ अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर येताच गाडीची तपासणी केली. त्यात जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या राहूलला ताब्यात घेण्यात आले.

तपासणीत त्याच्याकडून सुमारे ४३ लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागडे घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के. मीना यांच्या पथकाने केली. चौकशीत नोकराने वेळेवर पगार होत नसल्याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा :

The post जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक appeared first on पुढारी.