
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून, तर यंदा समाधानकारक पाऊस अद्यापही झालेलाच नाही. त्यामुळे भुजलपातळी खालावली आहे. त्यातच पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्याने दिवसेंदिवस भुजलपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.
केळी पिकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर आणि चोपडा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने घसरू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत या तालुक्यातील ‘डार्क झोन’मध्ये असलेल्या गावांच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक असून, पाणी पातळी उंचावण्यासाठीचे उपाय फारसे प्रभावी व व्यापक नसल्याने अडचणी वाढत आहेत. गेल्या २० वर्षांत केळी पिकासाठी पाण्याचा भूगर्भातून झालेला भरमसाट उपसा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, पाणी अडवा-पाणी जिरवा या योजनेकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, यामुळे या भागातील भूजल पातळी हळूहळू खाली घसरली आहे. गेल्या ३० वर्षात ही भूजल पातळी दुप्पटीने खालावली आहे. या भागात विहिरींची पाणीपातळी १९९० च्या सुमारास सरासरी शंभर फुटांवर होती, ती आता सरासरी दोनशे फुटांच्या खाली गेली आहे. कूपनलिकांना जिथे दीड-दोनशे फुटांवर मुबलक पाणी लागायचे, तिथे आता चार-पाचशे फुटांवर पाणी लागण्याची खात्री नाही.
महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया : रावेर, यावल आणि चोपडा हे तीनही तालुके सातपुड्याच्या कुशीत वसलेले आहेत. सातपुड्यातून उगम पावलेल्या नागोई, भोकरी, सुकी, मात्राण, मोर, हडकाई, खडकाई, अनेर या नद्या आणि असंख्य नाल्यांमुळे या भागातील भूजल पातळी बरीच वर होती. पाण्याच्या दृष्टीने हा भाग सुजलाम् सुफलाम् असल्याने या भागास महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हटले जात होते.
ही गावे सेफझोनमध्ये…
जिल्ह्यात १५३५ गावांपैकी ११२२ गावांमध्ये ९० ते १०० टक्क्यांपेक्षा पाण्याचा अधिक उपसा होत असल्याची माहिती भूजल मुल्यांकनाच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, ही गावे डार्कझोनमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, केवळ ४१३ गावे सेफ झोनमध्ये आहेत. जिल्ह्यातील ४१३ गावांमध्ये पाण्याचा कमी उपसा आहे. त्यामुळे ही गावे सुरक्षित आहेत. यात भुसावळ, जामनेर, जळगाव, यावल, पाचोरा, चोपडा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, मुक्ताईनगर, चाळीसगाव या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या तालुक्यातील गावे सेफझोनमध्ये आहेत.
२४३ गावे अतिशोषित…
भूजल मुल्यांकनानुसार जिल्ह्यातील आठ पाणलोट क्षेत्रातील २४३ गावांमध्ये १०० टक्क्यापेक्षा अधिक पाण्याचा उपसा होत असल्याने या गावांचा अतिशोषित वर्गवारीत समावेश केला आहे. यात रावेर तालुक्यातील सर्वाधिक ११९ गावांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याचा उपसा होत आहे. तर जळगाव तालुक्यातील १८ आणि अमळनेर तालुक्यातील ४७ गावांमध्येही ९० ते १०० टक्के पाण्याचा उपसा केला जातो आहे.
हेही वाचा:
- मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी का संपवत आहेत जीवनयात्रा?
- Sai Tamhankar : नभातील शुक्राचे लोभसवाणे चांदणे🔥; ग्रीन साडीत सईचा मराठमोळा लूक
- दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग
The post जळगाव : पाण्याचा अमर्यादीत उपसामुळे जिल्ह्यातील ११२२ गावे डार्कझोनमध्ये appeared first on पुढारी.