Site icon

जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सावदा पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी म्हणून दाखल न करण्यासाठी १५ हजारांची लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी जळगाव एसीबीने सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (५२, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (३२, रा.सावदा, ता.रावेर) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जळगाव तालुक्यातील ४२ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आकाश कुमावतविरोधात सावदा पोलिसात अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आकाश यास दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार हे मुलास भेटण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी मुलीला तुमच्या घरी आणले होते. त्यामुळे या गुन्ह्यात तुम्हाला आरोपी न करण्यासाठी ६० हजारांची पंचांसमक्ष लाच मागितली. मात्र तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संशय आल्याने लाच स्वीकारण्याचे नाकारले. मात्र, एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर वरीष्ठांच्या आदेशान्वये मंगळवार (दि.१) दोघा संशयीतांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई…
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक बाळु मराठे, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा:

The post जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version