जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल

railway tikit www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात ८३ हजार फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ८१ लाखांचा दंड वसूल केला आहे. यासाठी ६०० वर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५७३ प्रवाशांनाही ८७ हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

दिवाळसणाच्या सुट्टंयाची पर्वणी साधून प्रवासी गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवाशाची संधी साधतात. तसेच सामान्य तिकीट घेऊन स्लीपर क्लासमध्ये प्रवास करतात. अशा प्रवाशांविरोधात रेल्वेने कारवाईची मोहीम सुरू करुन रेल्वे स्थानक परिसरात तसेच स्थानकावर उभ्या असलेले गाड्या व धावत्या गाड्यांमध्ये विविध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई राबवली. यात भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा तसेच विभागातील छोट्या स्थानकांचा देखील समावेश आहे.

८३ हजार फुकट्यांवर कारवाई…

भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानक तसेच धावणाऱ्या गाड्यातून ८३ हजार ६०६ विना तिकीट प्रवासी तसेच सामान्य तिकिटावर स्लीपर व एसी क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून तब्बल ६ कोटी ८१ लाख ५४ हजार २७९ इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५७३ जणांविरुद्ध ८७ हजार २९० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ. शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाणिज्य प्रबंधक ए.के. पाठक, मंडल मुख्य तिकीट निरीक्षक एन. पी. पवार, मुख्य तिकीट निरीक्षक वाय.डी. पाठक, डी.के. वर्मा, व्ही.एल.आठवले यांच्यासह तिकीट निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा:

The post जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल appeared first on पुढारी.