Site icon

जळगाव : ब्रिटीशकालीन पी. जे. रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये होणार विस्तारीकरण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पाचोरा ते जामनेरपर्यंत धावणारी ब्रिटिश कालीन नॅरोगेज ही पॅसेंजर रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात पाचोरा येथील समविचारी नागरिकांनी एकत्रित येऊन पी. जे. बचाव कृती समिती गठीत करुन वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढुन प्रशासनास वारंवार निवेदने देऊन ही बंद करु नये. अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्याचीच फलश्रृती म्हणून रेल्वे प्रशासनाने पाचोरा येथील पी. जे. बचाव कृती समितीच्या रास्त मागण्यांचा विचार करत पाचोरा ते जामनेर (पी. जे.) या नॅरोगेज पॅसेंजर गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर मलकापूर पर्यंत विस्तारीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने नुकतेच राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध केले असल्याची माहिती पी. जे. बचाव कृती समितीचे पदाधिकाऱ्यांनी पाचोरा येथील हुतात्मा स्मारकात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी खलिल देशमुख, ॲड. अविनाश भालेराव, सुनिल शिंदे, भरत खंडेलवाल, प्रा. गणेश पाटील, अनिल (आबा) येवले, नंदकुमार सोनार, पप्पू राजपुत, प्रा. मनिष बाविस्कर, शाहबाज बागवान, संजय जडे उपस्थित होते.

आंदोलनाची दखल…
सुमारे १०२ वर्षांपासून धावणारी ब्रिटिश कालीन पाचोरा ते जामनेर ही पॅसेंजर रेल्वे कोरोना काळापासून ते आजतागायत रेल्वे प्रशासनाने बंद केले आहे. गोरगरिबांसाठी जीवनवाहिनी समजल्या जाणारी ही रेल्वे प्रशासनाने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पाचोरा, जामनेर तालुक्यातील व्यापारी, प्रवाशी, समाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांना सोबत घेत पी. जे. बचाव कृती समिती गठीत करण्यात आली. यानंतर समिती पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी धरणे आंदोलन, मोर्चे काढून पाचोरा ते जामनेर ही रेल्वे बंद करु नये. तसेच पाचोरा ते जामनेर या रेल्वेचे मलकापूरपर्यंत ब्रॉडगेजमध्ये विस्तारीकरणाची मागणी लावून धरली होती.

शेतकऱ्यांना मिळाली नोटीस…
यानंतर तत्कालीन जी. एम. अनिल लाहोटी यांनी याविषयी पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावत, रेल्वे प्रशासनाने पाचोरा ते जामनेर या नॅरोगेज रेल्वे पाचोरा ते मलकापूर पर्यंत (ब्रॉडगेज) विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. या मार्गावरील रेल्वे लाईन लगत असलेल्या पाचोरा, जामनेर तालुक्यातील ३१ शेतकऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडुन नोटीस देखील प्राप्त झाली आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : ब्रिटीशकालीन पी. जे. रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये होणार विस्तारीकरण appeared first on पुढारी.

Exit mobile version