Site icon

जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व. वा. वाचनालयाच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र स्तरीय महामूर्ख संमेलन पार पडले. या संमेलनाला भाजपचे आमदार सुरेश भोळेही उपस्थित होते. ‘मी केलेला मूर्खपणा’ या विषयावर आमदार भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘राजकारणात आलो हाच मूर्खपणा केला’, असं जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे यांनी म्हणताच उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. या महामूर्ख संमेलनाने उपस्थितांचं चांगलेच मनोरंजन केल्याचे पहायला मिळाले.

होळीच्या पार्श्वभूमीवर जळगावात महामूर्ख संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात करमणूक म्हणून थापा मारण्याची स्पर्धा, फिशपाँडसह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना कांदे, बटाट्याच्या माळा घालून आणि मूर्खनरेश, मूर्खसम्राट, मूर्खशिरोमणी सारख्या पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे हे मूर्ख संमेलन चांगलेच रंगले.

पायातून वांग्याची माळ घालत सन्मान
यावेळी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, माजी नगरसेवक विजय वाणी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमदार सुरेश भोळे यांना वांग्याची माळ पायातून घालून आणि मूर्ख भूषण ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच बरोबर गाढवाच्या प्रतिमेला नारळाच्या सालीची माळ घालून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

थापा मारणे स्पर्धा …
उपस्थित हास्य कवींनी हास्य कविता सादर केल्या. थापा मारणे स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विजेत्याचा मूर्ख नरेश पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. ‘मी केलेला मूर्खपणा’ या विषयावर मनोगत व्यक्त करण्यात आले. राजकारणात आलो हाच आपला मूर्खपणा ठरला, अशी कबुली यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी दिली. तर माजी नगरसेवक विजय वाणी यांनी मनोगतात सर्व काही व्यवसाय व्यवस्थित असताना आपण राजकारणात आलो आणि राजकारणाचा बळी ठरून जेलची हवा खावी लागली, असं म्हटले. यावेळी हास्य कवींनी सध्याच्या राजकारणावर आणि विकासाच्या प्रश्नावर मार्मिक अशा हास्य कविता सादर केल्या. या महामूर्ख संमेलनाने उपस्थितांची चांगलीच करमणूक केल्याचं यावेळी पाहायला मिळाले.

हेही वाचा :

The post जळगाव : भाजप आमदारांना मुर्खभूषण पदवी; होळीच्या पार्श्वभूमीवर रंगले महामूर्ख संमेलन appeared first on पुढारी.

Exit mobile version