जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. भुसावळात एका २८ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डॉ. राजेश मानवतकर यांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याचे बाजारपेठ पोलिसांना कळविले आहे.

भुसावळातील गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) हा पुणे येथे रेल्वेत नोकरीला आहे. आजीच्या तेराव्यासाठी तो भुसावळात आला होता. गिरीश याला १५ दिवसांपूर्वी मुलगी झाली असून, तो त्याच्या पत्नीला व बाळाला पाहण्यासाठी १४ रोजी जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे गेला होता. त्यानंतर आईला घेऊन नशिराबाद येथे नातेवाईकांकडे गेला. आज सकाळी त्याला उलट्या होऊ लागल्याने व पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी औषधी देऊन त्याला घरी पाठवले, मात्र उलट्या न थांबल्यामुळे दुपारी १२ वाजेच्या सुमारास डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी २ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. मानवतकर यांनी बाजारपेठ पोलिसात माहिती दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

The post जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.