Site icon

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा

शेती-शिवारात बिबट्याचा अधिवास असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून गावात चर्चा होती. सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष प्रविण खिरोडकर, गजानन पाटील यांनी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावून घेतले. अखेर बिबट्याचा अधिवास असल्याचे सिद्ध झाले असून शेतकऱ्यासह शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजे नांदवेल व चिंचखेडा बु. येथील शेतशिवारात गेल्या आठवड्यात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळुन आल्या होत्या, तसेच काहींनी बिबट्याला पाहीले होते. दरम्यान महिनाभरापुर्वी चिंचखेडा येथील पशुधनावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याचीही घटना घडली होती.

शेतीरस्त्यावर बसविले ट्रॅप कॅमेरे…
नांदवेल-चिंचखेडा बु. शिवारातील पुर्णा नदीकाठालगतच्या शेती-शिवारात बिबट्याचा अधिवास आहे. गावात याबाबत चर्चा झाल्याने नांदवेल येथील सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष प्रविण खिरोडकर, गजानन पाटील यांनी वनविभागाला कळविले. दरम्यान वनविभागाकडून शेतीरस्त्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. बिबट्याची छबी कॅमेऱ्यात ट्रॅप झाली आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
केळीबागा तसेच मका पीकात रानडुक्करांच्या तसेच अन्य भक्ष्यांच्या शोधात बिबट्या फिरत आहे. मात्र शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण असुन शेतात काम करण्यास धजावत नसल्याने शेतकरी वर्गांची चिंता वाढली आहे. शेतात काम करीत असतांना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे appeared first on पुढारी.

Exit mobile version