जळगाव : मुलीचा विवाह दुसऱ्याशी करणाऱ्या बापाला प्रियकराने बंदूक दाखवून दिली धमकी

बंदूक ,www.pudhari.news

जळगाव : मुलीचा विवाह आपल्या सोबत न केल्याचा राग आल्याने मुलीच्या बापासह एकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तर एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना पाचोरा शहरातील गणपती नगरात घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गणपती नगरात ५२ वर्षीय व्यक्ती हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह रोहित राजू सोनवणे (रा. शिवाजी नगर, मलकापूर) याच्याशी न केल्याचा राग आल्याने रोहीत सह इतर अनोळखी दोन जणांनी मुलीच्या घरी येवून मुलीच्या बापाच्या कपाळावर बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तर फिर्यादीचा भाचा याला देखील इतर दोन जणांनी चाकूने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटना घडल्यानंतर तीनही संशयित आरोपी पसार झाले आहे. याप्रकरणी पीडीत प्रौढ व्यक्तीच्या फिर्यादीवरून पाचोरा पेालीस ठाण्यात रोहीत राजु सोनवणे व अन्य दोन अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक भारत काकडे व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट देवुन आरोपींना पकडण्याच्या सुचना दिल्या आहेत.

The post जळगाव : मुलीचा विवाह दुसऱ्याशी करणाऱ्या बापाला प्रियकराने बंदूक दाखवून दिली धमकी appeared first on पुढारी.