जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला रावेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यास ताकदीनिशी आपण ही निवडणूक लढवू, असे सुतोवाच माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर येथे केले. मनीष जैन यांच्या निवडणूक लढवण्याच्या इच्छेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रावेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पाहणीनिमित्त कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी माजी आमदार मनिष जैन हे देखील सोबत उपस्थित होते. यावेळी अचानक मनीष जैन यांना पाहून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. उत्तर देताना त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.

रावेर मतदारसंघात चुरस वाढणार

रावेर विधानसभा मतदार संघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. या ठिकाणी शिरीष चौधरी हे विद्यमान आमदार असून त्यांनी भाजपचे उमेदवार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना पराभूत केले होते. मात्र, आगामी निवडणुकीत या ठिकाणी बदल होऊन, रावेर विधानसभेची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला सुटणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनीष जैन यांनी स्वत: येथून उतरणार असल्याचे सांगितले आहे.

तर भाजपतर्फे डॉ. कुंदन फेगडे, नंदू महाजन आदींची नावे चर्चेत आहेत. कॉंग्रेसच्या वतीने शिरीष चौधरी अथवा त्यांचे पुत्र धनंजय चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहेत. याच्या जोडीला आता मनीष जैन यांनी देखील इच्छा व्यक्त केल्याने येथील लढत ही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार appeared first on पुढारी.