Site icon

जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही – गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

संजय राऊत यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही. ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा नेम नाही. अशा शब्दात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली.

भाजप नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकित काँग्रेसचा विजय तर भाजपचा पराभव झाला आहे. या निकालावर खासदार संजय राऊत यांनी ‘कसबा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर मंत्री महाजन यांनी पलटवार केला आहे.

एक जागा जिंकली म्हणजे तीर मारला का?
राऊत यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही, ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा काही नेम नाही, कसब्यातील एक जागा जिंकली म्हणजे तीर मारला असे समजायचे कारण नाही, आता जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणूका आहेत तेथे काय दिवे लावतात ते शिवसेनेने दाखवावे, असे म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊतांसह महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले आहे.

निवडणुकीत दडपशाहीचा आरोप निराधार…
राज्यात शिवसेनेचा सुपडा साफ झालेला आहे. तीन राज्यात भाजप वेगाने पुढे आले. मोदींच्या नेतृत्वात शिक्कामोर्तब झालेला आहे. त्याचे त्यांना घेणं देणं नाही. एक जागा थोड्या मताने निवडून आली तर त्यांना झाकी, बाकी दिसायला लागली. आता जिल्हा परिषद, नगरपालिका महापालिकांच्या निवडणूका आहेत. तेथे शिवसेना काय दिवे लावते ते त्यांनी दाखवावे. कसब्यात निसटता पराभव झाला आहे, तो मान्य करावा लागेल. आपण स्वत: त्या ठिकाणी होतो. या निवडणुकीत दडपशाही केल्याचा आरोप निराधार आहे. असे आरोप होतच असतात, दडपशाही राहिली असती तर निकाल वेगळा लागला असता असेही महाजन यावेळी म्हणाले.

हेही वाचा:

The post जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही - गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Exit mobile version