जळगाव : सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले, मी एकट्याने काय केले? 

गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. गुवाहाटीला जाताना मी ३३ व्या क्रमांकावर होतो. माझ्या आधी ३२ जण गेले. मी जर गेलो नसतो तर नागपूर ते मुंबई एकटाच उरलो असतो. मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केले असते? सर्वच शिंदेंसोबत पळून गेले होते, असे वक्तव्य शिवसेना नेते तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी केले आहे.

जळगावात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय जलजीवन मिशनअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील साळवे गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. यानिमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील हे भूमिपूजनासाठी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सत्तांतराचा घटनाक्रम नेमका कसा घडला? ते सांगितले.

ते म्हणाले की, सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवले. मात्र, या सगळ्या सत्तांतरांच्या काळात मी तर जाणारा ३३ वा होतो. माझ्या आधी ३२ जण गेले होते. सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार गेले होते. त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले होते, असे पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत अनेक जण जात होते. नागपूरपासून ते मुंबईपर्यंत सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले. मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केले असते? सर्वच शिंदेंसोबत पळून गले. चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग मीदेखील शिंदेंसोबत गेलो. माझ्यावरती गद्दारीची टीका झाली. मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे, तो महाराष्ट्राचा झाला नसता. त्यामुळे मी एकटाच मूळ ट्रॅकवर आलो असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

हिंदुत्वासाठी सट्टा खेळलो
आपल्या मंत्रिपदाबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, हे मंत्रिपद मला सहज मिळाले नाही. मी माझ्या राजकीय आयुष्यात अनेक आंदोलने केली. १५ ते २० वेळा जेलमध्ये गेलो होतो. मी तर मंत्रिपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती. मात्र, एकनाथ शिंदेंसोबत जाऊन एक सट्टा खेळलो. हिंदुत्वासाठी सट्टा खेळलो. ज्या भगव्या झेंड्याकरता बाळासाहेबांनी आयुष्य वेचले, त्या भगव्या झेंड्याला वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलो. आम्ही पक्ष सोडलेला नाही, दुसऱ्या पक्षासोबत गेलेलो नाही. अजूनही शिवसेनेसोबतच आहोत. आम्ही हे पाप केले असेल तर लोकांनी पापी म्हणावे, अशी टिप्पणी गुलाबरावांनी केली.

हेही वाचा:

The post जळगाव : सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले, मी एकट्याने काय केले?  appeared first on पुढारी.