जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट

जळगाव पाटील,www.pudhari.news

जळगाव : चेतन चौधरी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेत फाटाफूट झाली आहे. शिंदे गटात जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आणि एक अपक्ष असे पाच आमदार सामील झाल्याने शिवसेनेची जळगाव जिल्ह्यातील वाटचाल बिकट झाली आहे. बंडखोरी करणारेे गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील या विद्यमान आमदारांना पुन्हा कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागणार आहे. जिल्ह्यात बंडखोर आमदारांविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये तत्काळ तीव्र संताप दिसून आला आहे. जिल्ह्यात ठाकरे समर्थकांनी ठिकठिकाणी पुतळे जाळले, निदर्शने केली. तसेच या आमदारांना धडा शिकविण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भर चौकात उभा राहून केला. पदाधिकार्‍यांच्या नाराजीचा डोंगर या तिघा पाटलांना पार करून पुन्हा मुंबई गाठणे त्यांच्यासाठी दमछाक करणारे ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक पाठोपाठ जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने भक्कमपणे पाय रोवलेले आहेत. एकेकाळी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला जळगाव गेल्या चार-पाच वर्षांत काहीसा शिवसेनेकडे झुकलेला दिसतो. गुलाबराव पाटील यांचा दबदबा तर राज्यपातळीवर आहे. शिवसेनेत त्यांच्या शब्दाला मान होता. जळगावच्या ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे भक्कम करण्यात त्यांचेही योगदान अधिक राहिलेले आहे. परंतु त्यांना आपला मतदारसंघ सांभाळण्यावर भर द्यावा लागणार आहे.

तीन ‘गुलाबां’मध्ये काटेरी लढत
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराब पाटील जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटलांचा पराभव केला होता. आजवर पक्षनिष्ठेबद्दल बोलणारे गुलाबराव पाटील यांनीच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात धाव घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वांनाच धक्का बसला असून, कार्यकर्त्यांमध्येही संतापाची लाट निर्माण झाली आहे. आता गुलाबराव देवकरही मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यात सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली आहे. धरणगावसह परिसरात वाघ यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत गुलाबराव पाटलांसमोर तगडे आव्हान राहणार आहे.

पाचोर्‍यात किशोर पाटलांचे मताधिक्य घटले
पाचोरा-भडगाव मतदारसंघातून आमदार किशोर पाटील हे दुसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014 च्या निवडणुकीपेक्षा 2024 ची निवडणूक किशोर पाटलांसाठी अवघड जाणार आहे. गेल्या निवडणुकीत केवळ 1200 मतांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यातच भडगाव तालुक्यात किशोर पाटलांचे मताधिक्य घटले आहे. त्यातच आता बंडखोरीचा शिक्का लागल्याने किशोर पाटील यांच्यासमोर अमोल शिंदे यांचे कडवे आव्हान राहणार आहे.

चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या
शिवसेना जिल्हाप्रमुख राहून चुकलेले आ. चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघात जेमतेम मतांनी निवडून आले आहेत. या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी चंद्रकांत पाटलांना शिवसेना-राष्ट्रवादीसह भाजपच्याही काही नाराज पदाधिकार्‍यांनी छुपी मदत केल्याची चर्चा आहे. या तीनही पक्षांच्या पाठिंब्यामुळे पाटील हे काठावर विजयी झाले होते. आता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले, त्यात त्यांना विधान परिषदेत झालेल्या विजयामुळे चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांना ना शिवसेना उमेदवारी देणार ना राष्ट्रवादी त्यामुळे त्यांना केवळ भाजपचाच एक आधार आहे.

पारोळा मतदारसंघात
फेरपालट होणार?
पारोळा मतदारसंघाचा इतिहास काही वेगळाच आहे. याठिकाणी दर पाच वर्षांनंतर बदल होतोच. कधी चिमणराव पाटील, तर कधी डॉ. सतीश पाटील हे आलटून-पाटलून निवडून येतात. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील हे तिसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता बंडखोरीनंतर एरंडोल-पारोळा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये चिमणराव पाटलांविरुद्ध प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने हे चिमणरावांचे विरोधक मानले जातात. त्यामुळे आता 2024 मधील विधानसभा निवडणुकीत चिमणरावांना मोठे आव्हान राहणार आहे.

चोपडेकर सोनवणेंना पुन्हा संधी देणार का?
चोपडा विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये प्रा. चंद्रकांत सोनवणे, तर 2019 मध्ये त्यांच्या पत्नी लताबाई सोनवणे या शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत. मात्र, सोनवणे हे जळगाव येथील रहिवासी असून, त्यांना चोपड्यात उमेदवारी दिल्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आधीच रोष आहे. त्यात आता आ. लताताई सोनवणे यांनी बंडखोरी केल्याने जनतेतही संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक लताताई सोनवणे यांच्यासाठी सोपी नाही. त्यांची बंडखोरी स्थानिक पदाधिकार्‍यांच्या पथ्यावर पडली आहे. शिवसेनेतील पदाधिकारी आणखी सक्रिय झाले असून, त्यांनी रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला. परंतु हा संताप आगामी निवडणुकीत काय चित्र असेल याचे संकेत आताच देतो.

The post जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट appeared first on पुढारी.