
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मंजुर झालेल्या पीककर्जाचा बोजा सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी १३६० रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी व्यक्तीला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि.16) दुपारी साडेबाराच्या सुमारास अटक केली. भगवान दशरथ कुंभार (४४, बांबरूड, ता.पाचोरा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील ३९ वर्षीय तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेतजमीन आहे. या शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शाखा -सामनेर या बँकेकडून १ लाख ३० हजार रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. मंजूर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी भगवान कुंभार याने तलाठ्यांकडून तुमचे काम करुन देतो. या कामाच्या मोबादल्यात १३६० रुपये लाचेची मागणी केली. मात्र लाच न देता तक्रारदाराने त्वरीत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पथकाकडून सापळा रचण्यात आला. मंगळवारी (दि.16) दुपारी १२.३० च्या सुमारास बांबरूड येथे आरोपीच्या घराजवळच सापळा रचून लाचखोरास रंगेहाथ पकडण्यात आले. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एन. एन. जाधव व सहकाऱ्यांनी सापळा यशस्वी केला.
हेही वाचा:
- जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण
- गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो, चर्चेला उधाण
- धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन
The post जळगाव : सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजा लावण्यासाठी घेतली लाच, पाचोऱ्यात एकास अटक appeared first on पुढारी.