Site icon

जळगाव : साळींदराचे मटण पडले महागात ; चौघे वनविभागाच्या जाळ्यात

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील चिंचखेडा खुर्द येथे रंगपंचमीच्या दिवशी वन्यपशू (सायळ) साळिंदरची शिकार करून मटणाची पार्टी करीत असलेल्या चौघांच्या वनविभागाच्या पथकाने मुसक्या बांधल्याने शिकार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

चिंचखेडा खुर्द शिवारात वन्यपशु साळिंदरचे (सायळ) मटण चुलीवर शिजत असताना त्यावर ताव मारण्याच्या आधीच वनविभागाच्या पथकाने धाड टाकल्याने चिंचखेड्याच्या चौघांच्या आनंदावर विरजण पडले. या प्रकरणी निवृत्ती उर्फ बाबुराव रामचंद्र मेनकार, ऋषिकेश सुरेश अहिरकर, सुपडा रामचंद्र मेनकार (तिघे रा.चिंचखेडा खुर्द, ता.मुक्ताईनगर), शंकर साहेबराव सपकाळ (रा.बुलढाणा) यांना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई….
वढोदा वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, वनपाल बी.आर.मराठे, वनरक्षक ज्ञानोबा धुडगंडे, राम आसुरे, बी.बी.थोरात, गोकुळ गोसावी, वनमजुर अशोक तायडे, अशोक पाटील यांच्या पथकाने चिंचखेडा खुर्द शिवारातील सुपडा रामचंद्र मेनकार यांचे गट क्र 38 शेतात ही कारवाई केलीे. रक्ताने माखलेली काठी, साळिंदरचे चार पंजे आणि अर्धवट जळालेले काटे पथकाने जप्त केले. तपास वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे करत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : साळींदराचे मटण पडले महागात ; चौघे वनविभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version