जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण

विद्यार्थ्याला मारहाण

जळगाव: खासगी क्लासमध्ये दिलेला होमवर्क न केल्याने एका ९ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस मध्ये घडला आहे. याबाबत शिक्षिकेवर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शनीपेठेतील गुरूनानक नगरातील रहिवाशी योगेश गणेश ढंढोरे (वय-३७) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेबद्दल तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, त्यांचा ९ वर्षाच्या मुलाला बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस येथे खासगी क्लास लावलेला आहे. या ठिकाणी पल्लवी जितेंद्र इंदाणी (रा. मगर पार्क वाघ नगर) या शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, ढंढोरे यांच्या मुलाने क्लासमध्ये दिलेला अभ्यास केला नाही. म्हणून शिक्षीका पल्लवी इंदाणी यांनी त्याला शर्ट काढून मारहाण केली तर क्लास संपेपर्यंत इतर विद्यार्थ्यांसमोर उभे करून ठेवले होते, अशी लेखी तक्रार पालक योगेश ढंढोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यांच्या तक्रारीवरून शिक्षिका पल्लवी इंदाणी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

The post जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण appeared first on पुढारी.