जागतिक बाजारपेठेत भारतीय कांदा पडला पिछाडीवर

नाशिक : अमित यादव

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या विशिष्ट गुणवैशिष्ट्यांमुळे भारतीय विशेषत: जिल्ह्यातील कांद्यास जगभरातून प्रचंड मागणी होती. त्यामुळेच जागतिक बाजारात अनेक दशके हुकमी एक्का म्हणून मिरवलेल्या कांद्याची गेल्या पाच वर्षांपासून मात्र पीछेहाट सुरू झाली आहे. केंद्राचे कांदा निर्यातीचे धरसोडीचे धोरण हे प्रमुख कारण असून, पाकिस्तान, चीन, बांगलादेश यांसारख्या स्पर्धक देशांतील कांद्याने भारतीय कांद्याच्या जागतिक बाजारावर आपले स्थान मिळवले आहे. परिणामी यंदा महाराष्ट्रातील सुमारे ७ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली असून, राज्याचे जवळपास बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्हा देशातील कांद्याचे आगर समजला जातो. मात्र, सरकारकडून वारंवार होणाऱ्या निर्यातबंदीचा व्यापाराला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही कमी भाव मिळत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. पूर्वी निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता; परंतु २०२३-२४ या वर्षात आधी निर्यातीवर शुल्क लावणे, तसेच निर्यातबंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून १८७५ कोटींवर आली. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना परदेशातील असलेली हक्काची बाजारपेठ गमवावी लागली अाहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

  • भारताच्या हुकमी स्थानाला पाकिस्तान, चीनचा धक्का
  • महाराष्ट्रातून ७ लाख मे.टनाने निर्यातीत घट
  • राज्याचे बाराशे कोटींचे नुकसान
  • केंद्राच्या धरसोड धोरणाने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये संताप

कांदा आयात करणारे देश बनले निर्यातदार

सरकारने घेतलेले कांद्याबाबत धोरण, वातावरणातील बदलाने उत्पादनात वाढ व घट यामुळेही निर्यातीवर परिणाम झाला आहे. एकेकाळी अरब राष्ट्रात भारतीय कांद्याची मक्तेदारी होती. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही. श्रीलंका, थायलंड हे भारतीय कांद्याचे ग्राहक आता कांदा उत्पादन व निर्यातीत उतरले आहेत. भारतीय कांद्याइतकाच दर्जेदार कांदा पाकिस्तान व चीनचा असल्याने त्यांनी भारतीयांची मक्तेदारी असलेल्या देशात आपले पाय रोवले आहेत. तसेच हक्काची बाजारपेठही भारतीय गमावून बसले आहे.

कांद्याचे प्रमुख ग्राहक देश

कतार, युएई, इंडोनेशिया, कुवैत, मॉरिशस, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया

जागतिक बाजारपेठेत पाकिस्तान, चीन बाजी मारत आहे. कांद्याची खुली निर्यात ठेवल्यास इतर देशांशी भारताचे संबंध देखील चांगले राहतात. तसेच शेतकरी व व्यापारी या दोघांचाही फायदा होतो. अन्यथा इतर देशातील प्रस्थापित बाजारपेठ गमवावी लागून, परकिय चलनाबरोबरच अनेक नुकसान देशाला होत असतात. – दिनेश बागरेचा, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत.

कांद्याचे प्रमुख स्पर्धक

पाकिस्तान, चीन, इजिप्त, नेदरलॅन्ड, मेक्सिको, स्पेन, न्यूझीलंड, पेरू.
देशातील कांदा निर्यातीची स्थिती

वर्ष                             निर्यात (टन)                               किंमत (कोटी)
२०२०-२१                    १५,७८,०१६                                   २.८२६
२०२१-२२                    १५,३७,४९६                                   3.४३२
२०२२-२३                    २५,२५,२५८                                   ४.५२२
२०२३-२४                    १७,०७,९९८                                   ३.८७३

सरकारने कांदा निर्यातबंदी लागू करू नये. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना याचा फायदा होतो. तसेच नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु असून, त्यापेक्षा व्यापाऱ्यांकडून चांगला दर शेतकऱ्यांना मिळत असतो. सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, भारतासारख्या निर्यातदार देश हक्काची हक्काची बाजारपेठही गमावून बसतो. – अनुप थोरात, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत

हेही वाचा: