Site icon

जागतिक शौचालय दिन विशेष : नैतिक जबाबदारीचे भान राखून स्वयंशिस्त पाळूया…!

नाशिक : अंजली राऊत
जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेला जागतिक शौचालय दिन आता सर्वदूर पोहोचलेला आहे. ‘मेक इन इनव्हिझिबल टू व्हिझिबल-2022’ ही यंदाची थीम आहे. शौचालयाबाबत बहुतेक गोष्टी प्रत्यक्षात अंमलात आणल्या जात नाहीत. जिल्ह्याच्या विविध भागांतून विद्यार्थिनी आणि नोकरदार महिला या नोकरी व शिक्षणानिमित्त शहरात येत आहेत. महिलांच्या संख्येनुसार मात्र सार्वजनिक शौचालयांची कमतरता आहे. शौचालयांबाबत स्वच्छतेच्या गोष्टी नागरिकांच्या मनावर ठासून, त्यांच्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवणे आवश्यक आहे. स्वच्छतेची गरज ही नैतिक जबाबदारी असून, प्रत्येकाने ही स्वयंशिस्त पाळून इतरांनाही प्रवृत्त करणे गरजेचे असल्याचा सूर शौचालय दिनानिमित्त लोकप्रतिनिधी, मनपा अधिकारी, डॉक्टर, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याशी साधलेल्या संवादातून निघाला आहे.

सार्वजनिक शौचालय या विषयाबाबत आपल्याकडे जागेची अडचण भेडसावत आहे. हॉकर्स महिलांपासून तर नोकरदार महिलांपर्यंत ठिकठिकाणी शौचालय असणे गरजेचे आहे. परंतु नाशिक महानगर क्षेत्रात शौचालयांसाठी जागा मिळणे अलीकडे खूपच अवघड झाले आहे. पुरुषांसाठी रस्त्यावरदेखील सहजपणे शौचालय उभारू शकतो. परंतु, महिलांसाठी शौचालय बांधण्यासाठी सुरक्षारक्षक, जागा व इतर गोष्टींचाही प्राधान्याने विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यासाठी जागा मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
– देवयानी फरांदे, आमदार

 

स्मार्ट सिटी अंतर्गत बर्‍याच ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची संख्या दिलासादायक आहे. शहरातील प्रबुद्धनगर, संत कबीरनगर अशा ठिकाणी महिलांकरिता शौचालयाचे नियोजित आहे. त्याचप्रमाणे शौचालयाबाबत स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. शौचालयाची इमारत उभारली जाते, परंतु त्याची स्वच्छता राखली जात नसल्याने दुरवस्था होत असल्याचे निदर्शनास येते. नागरिकांमध्ये स्वयंशिस्त हवी. जेणेकरून शौचालयाची स्वच्छता आपोआपच राखली जाईल.
– सीमा हिरे, आमदार

शौचालयांअभावी महिलांबाबतच्या समस्या अमर्याद आहेत. पाणी पिल्यावर लघवीला जावे लागू नये म्हणून पाणीच पिणे टाळले तर डिहायड्रेशन, बीपी लो होऊन चक्कर येणे, परिणामी गंभीर अपघात होऊ शकतो, युरिनवरही परिणाम होऊन ते इन्फेक्शन दीर्घकालीन राहिल्यास शरीराला पाण्याचा पुरवठा कमी होऊन शरीरातल्या प्रत्येक अवयवावर घातक परिणाम दिसू लागतात. प्रवासात शक्यतो महिला अशा प्रकारे निर्णय घेतात व तो पूर्णत: चुकीचा आहे. त्यामुळे महिलांना व्यवस्थित टॉयलेट फॅसिलिटी मिळाल्याच पाहिजे. दररोज एक ते दोन रुग्ण या समस्येच्या निरसनासाठी येत आहेत. माझ्याकडे येणार्‍या 25 पैकी 10 रुग्ण हे पोटासंबंधित विकाराने ग्रस्त असतात.
– डॉ. क्षमा अघोर, स्त्रीरोगतज्ज्ञ, नाशिक

 

घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमितपणे शौचालय साफसफाई केली जाते. तसेच बेजबाबदारपणे इतरत्र कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर स्वच्छतेबाबत चित्र रंगवले जातात. शौचालयाबाबत जनजागृती करीत ठिकठिकाणी शहरात फलक लावलेले आहेत. नाशिक मनपा कर्मचार्‍यांमार्फत शौचालयांची दैनंदिन व नियमित साफसफाई केली जात आहे.
– डॉ. आवेश पलोड, घनकचरा व्यवस्थापन संचालक

 

मनपाकडून हॉटेलसह पेट्रोलपंपावर महिलांकरिता ‘राइट टू पी’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना माहिती आहे त्या महिला याचा लाभ घेतात. सरकारने याबाबत जागरुकता वाढविणे आवश्यक आहे.
– संजय चव्हाण, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन

महिलांसाठीच्या सीटची संख्या
नाशिक पूर्व – 498, पश्चिम – 421
पंचवटी – 726, नाशिकरोड – 658
सिडको – 173, सातपूर – 323
एकूण – 2,799

पे अ‍ॅण्ड यूज शौचालयांची संख्या 131
कॉमन शौचालयांची संख्या 466
250 लोकसंख्येमागे शौचालयाचे
1 सीट आवश्यक

अस्वच्छतेमुळे होतात आजार…
कॉमन शौचालयातील सीटस अस्वच्छ असल्याने एकापासून दुसर्‍याला व त्यानंतर सगळ्यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास सुरू होतो. बॅक्टेरियाचे संक्रमण होऊन जळजळ होणे, पोटाच्या खालच्या भागांमध्ये वेदना होणे, खाज येणे आणि पिवळसर रंगाची लघवी होणे तसेच इकोला, कॉलरा, डायरिया व व्हायरल इन्फेक्शनही होऊ शकते. महिलांना पांढरा पदर किंवा गर्भपिशवीस होणार्‍या व फंगल इनफेक्शनला सामोरे जावे लागते. हात धुण्याचे टाळल्यानेही विविध आजाराला सामोरे जावे लागते.

अशा आहेत उपाययोजना
सार्वजनिक शौचालये वारंवार स्वच्छ होणे आवश्यक आहे. शाळांसह विविध ठिकाणी बेसिनवर साबण किंवा हॅण्डवॉश ठेवणे गरजेचे आहे. इन्फेक्शन होऊ नये म्हणून खूप जागरुकता बाळगणे गरजेचे आहे. ई-टॉयलेटसह पब्लिक टॉयलेटही खूप स्वच्छ असावेत. याठिकाणी डिस्पोझल कव्हर, हॅण्ड ड्रायर किंवा टिश्यू पेपर ठेवलेले असावेत. पुरुषांनी उघड्यावर मूत्रविसर्जन करू नये.

‘राइट टू पी’साठी आग्रही असावे
शासकीय धोरणानुसार ‘राइट टू पी’ या मोहिमेंंतर्गत महिला कोणत्याही हॉटेल्स, मॉल्समधील शौचालय अगदी विनामूल्य वापरू शकतात. त्यांची कोणीही अडवणूक करू शकत नाहीत. ‘राइट टू पी’करिता आग्रही राहून महिलांनी हक्काने मागणी मांडली पाहिजे. अशा बाबतीत तडजोड करणे पूर्णत: चुकीचे आहे. एक महिला दुसर्‍या महिलेला प्रवासात जास्त पाणी न पिण्याचा चुकीचा सल्ला देते. तसेच 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लघवी थांबून ठेवू नये.

हेही वाचा :

The post जागतिक शौचालय दिन विशेष : नैतिक जबाबदारीचे भान राखून स्वयंशिस्त पाळूया...! appeared first on पुढारी.

Exit mobile version