World Music Day 2024 : जागतिक संगीत दिन दरवर्षी २१ जून या रोजी साजरा केला जातो. संगीत केवळ मनोरंजनच करत नाही तर ती एक प्रकारची थेरपीही सुद्धा आहे. ज्यामुळे मन प्रसन्न आणि शांत होते. संगीताची उपयुक्तता आणि महत्त्व लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने जागतिक संगीत दिन साजरा केला जातो आहे.
शास्त्रीय संगीत हे सर्व संगीताचे अधिष्ठान आहेच. परंतु बदलत्या काळात विविध संगीत प्रकारांत सहयोगी, संवादी मिलाफ झालेला दिसत आहे. अगदी प्राचीन लोककलेतून आलेले लोकसंगीत, शास्त्रीय संगीत ते आधुनिक काळातील पाश्चात्य संगीतासह इतर संगीत प्रकाराचे ‘फ्युजन’ हा नव्या युगातील आवडता संगीतप्रकार होत आहे. शास्त्रीय संगीतासह विविध संगीत प्रकारांमध्ये एकत्रीकरण करून फ्युजन संगीत करण्याकडे संगीतकारांचा नव्या पिढीचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.
संगीतातील पंचम शक्तिस्थाने :
- आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी भारलेले आहे.
- निसर्गाच्या प्रत्येक स्थित्यंतरात, हालचालीत संगीत सामावले आहे.
- संगीत माणसाला रिझवण्याचे, बळकटी देण्याचे काम करते.
- दुर्धर आजारही संगीतोपचाराने बरे झाल्याची उदाहरणे आहेत.
- संगीतामुळे माणूस संवेदनशील होतो. त्याला भाव- भावना समजायला लागतात.
- संगीत जनसंवादाचे प्रभावी माध्यम, संगीताला नाही सरहद्दीचे बंधन!
गायन, वादन, नर्तन यांच्या सुरेख संगमाला ‘संगीत’ म्हणतात. ही सार्थ व्याख्या १३ व्या शतकात पं. शारंगदेव यांनी देवगिरी किल्ल्यावर लिहिलेल्या ‘संगीत रत्नकार’ या ग्रंथात केली. संगीत शब्दात या तिन्ही कलांचा संगम अपेक्षित आहे. तसा जगातील कुठल्या कला परस्परांना छेदून पुढे जात नाहीत तर त्या एकमेकांना पूरक, समांतर आहेत. विविध संगीत प्रकारांचा सहयोगी मिलाफ यंदाची संगीत दिनाची संकल्पना आहे. यामध्ये विविध संगीत प्रकारांचा संवादी मिलाफ अपेक्षित आहे. शास्त्रीय ते शुद्ध, निर्भेळ आणि इतर संगीत दुय्यम असा दुजाभाव करणयाचे दिवस केव्हाच मागे पडले आणि आज पाश्चात्य, शास्त्रीय संगीतातील मिलाफाचे फ्युजन संगीत रसिकांचे कान तृप्त करत आहेत.
संगीत प्रकारांचा संवादी मिलाफ म्हणजेच आजचे फ्युजन संगीत. अशा स्थित्यंतराची आवश्यकता या काळात आहेच. कुठलेही संगीत टिकवण्यासाठी आणि त्याला फक्त कलाकारांची कुशलता पुरेशी नसते तर संगीतामधील भावना रसिकांपर्यंत पोहोचाव्यात. मुख्य म्हणजे वादकांना या निमित्ताने फक्त गायकांना साथ न करता त्याच्या स्वतःचे वैयक्तिक कौशल्य दाखवता येते, तरीही पण जे वेगवेगळे संगीत प्रकार आहे त्याची मजा वेगळीच आणि आनंदही वेगळाच. – विद्या कुलकर्णी, सुगम संगीत गायिका, नाशिक.
संगीत दिनाची पार्श्वभूमी
जागतिक पातळीवर संगीत दिन साजरा करण्याची परंपरा प्रथम फ्रान्समध्ये रुजली. फ्रान्समध्ये संगीत दिनाला ‘फेटे डेला म्युसिक्यू’ असे संबोधले जाते. वास्तविक, लेबोनिज लोकांच्या जीवनात संगीत महोत्सवाचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत जणू त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनलाय. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती.
संगीत ‘मिलाफा’तून सुसंवाद हवा
संगीताला कुठलाही प्रकाराचे मेळ (फ्युजन) यांचे वावाडे नाही. सर्व संगीतातील प्रकाराचे एकत्रीकरण, मिलाफ सुसंवादी हवा. संगीत फ्युजनमुळे संवाद निर्माण झाल्यास ते कर्णमधुर होईल. आत्यंतिक सुसंवाद नसला तरी संगीतातून दुर्वाद निर्माण होता कामा नये. विविध संगीत प्रकारांतून निर्माण होणाऱ्या सुसंवादी संगीत सर्वत्र प्रसार व्हावा आणि ज्याला जे जे आवडेल त्या त्या प्रकाराच्या संगीत प्रकारांतून आनंद, ऊर्जा, निरामय आरोग्य मिळावे. – पं. अविराज तायडे, शास्त्रीय गायक.
हेही वाचा: