जातपंचायतीची मुजोरी! आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणावर बहिष्कार

नाशिक : राज्य सरकारने जातपंचायतींच्या मनमानीविरोधात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला असला तरी जातपंचायतींच्या तक्रारी मात्र कमी होत नाही. जातीतून बहिष्कृत करण्याचे प्रकार सुरूच आहे. त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की सिन्नर येथील वैदुवाडी येथील तरुण कृष्णा शिंदे याचे अन्य जातीच्या मुलीबरोबर प्रेम झाले. तिच्या सोबत होणारा आंतरजातीय विवाह वैदू जातपंचायतीस मान्य नव्हता. त्यांनी विवाहास फक्त विरोधच केला नाही, तर मारहाणही केली. अमानुषपणे त्याला वाडीबाहेर काढले. तो संबंधित मुलीसोबत दुसऱ्या ठिकाणी राहू लागला. 

नाशिकला झालेल्या वैदू जातपंचायतच्या तक्रारीनंतर जातपंचायतने त्याच्यावर तक्रार न करण्याचा दबाव आणला व दमदाटीही केली. परिवारानेही जातपंचायतीला घाबरून तक्रार करू नको, अशी भूमिका घेतली. त्याला डांबून ठेवले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांशी संपर्क साधून त्याची सुटका झाली. अशा परिस्थितीत एका बाजूने जातपंचायतचा अत्याचार व दुसऱ्या बाजूने कुटुंबाचा दबाव, अशा कात्रीत तो सापडला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जातपंचायत मूठमाती अभियानासाठी प्रयत्नशील आहे. 

अशा घटना पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा होऊनही अशा घटना थांबत नाही. त्या मुळे अशा जातपंचांवर गुन्हे दाखल होऊन पीडित तरुणास सन्मानाचे आयुष्य बहाल झाले पाहिजे. 
-कृष्णा चांदगुडे, 
राज्य कार्यवाह, अंनिसचे जातपंचायत मूठमाती अभियान