जातेगाव डोंगरावरील हत्येचा 24 तासांत उलगडा

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा – जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव डोंगर परिसरात सोमवारी (दि.१७) आढळलेल्या संशयास्पद मृतदेहाचा तपास करताना मोठ्या कटाचा उलगडा झाला आहे. मुंबई महापालिकेतील लिपिकाचा अनैतिक संबधांच्या त्रांगड्यातून पत्नी, मेहुणी, तिचा मुलगा, साडू यांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले असून, नांदगाव पोलिसांनी २४ तासांत सहापैकी चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या १७ तारखेला मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (५४, रा. भोईर चाळ, कल्याण वेस्ट, मूळ रा. वाघोरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांचा मृतदेह सापडला होता. घटनास्थळी अपघाताचे चित्र दिसत असले तरी त्याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी चौफेर तपासाची चक्रे फिरवली. आधारकार्डवरून मयताची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांच्या हालचाली टिपण्यात आल्या. परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर आप्तांची विचारपूस केली गेली असता त्यातून खुनाचा उलगडा झाला. सोनवणे व मोरे, लोखंडे परिवारातील सहा जणांनी ही हत्या केल्याचे आणि पत्नी व मेहुणी त्यामागील सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.

संशयित पत्नी पल्लवी दीपक सोनवणे, मेहुणी व मेहुणीचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे (रा. म्हसवे, ता. पारोळा) यांनी संदीप (रमेश) महादू लोखंडे (रा. शेजवळ, ता. मालेगाव), साईनाथ बाबुलाल सोनवणे, लखन बाबुलाल सोनवणे (रा. पिंप्री हवेली, ता. नांदगाव) यांच्याशी संगनमत करून खुनाचा कट रचला. त्यानुसार दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले. या ठिकाणी लाकडी दांडक्याने व डोक्यात दगड मारून ठार केले. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून देत प्रेत झाडावर टाकून असा अपघाताचा बनाव करत सर्वांनी पोबारा केला होता. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर यांनी उपरोक्तसह अनिता चंद्रकांत मोरे (रा. म्हसदे, ता. पारोळा) अशा सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पत्नी, लोखंडे, साईनाथ, नितीन मोरे यांना अटक झाली आहे.

.. म्हणून काढला काटा

मयत सोनवणे हे मुंबई महानगरपालिकेत लिपिकपदावर नोकरीला होते. त्यांचे मेहुणीशी तर पत्नीचे लोखंडेशी अनैतिक संबंध होते. त्यातच मयताने मेहुणीकडे नात्याला काळीमा फासणारी अन्य एका गोष्टीचा दगादा लावला होता. त्यातून कौटुंबिक कलह निर्माण झाला होता. पत्नी व मेहुणीला त्रास सुरू होता. या जाचाला कंटाळून या दोघींनी हा कट रचला. या कटात एक लाखांच्या बोलीवर लोखंडे याने त्याच्या मामेभाऊ व मामाच्या मुलालाही सहभागी करुन घेतल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक प्रीतम चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: