जात विचारल्याने सर्वेक्षणकर्त्या महिला शिक्षिकांना हाकलवले; परिसरात चर्चेचा विषय

सिडको (नाशिक) : शिक्षिकेने महापालिकेच्या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब सदस्याला जात विचारल्याचा राग आल्याने परिसरातील नागरिकांनी त्या महिला शिक्षकेला हाकलून लावल्याची घटना घडली. सिडको परिसरात सध्या हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. 

सिडको परिसरात चर्चा
महापालिका शिक्षण विभागातर्फे शहरांतर्गत शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम सुरू आहे. यासाठी महापालिका व खासगी शाळेतील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. गुरुवारी (ता.४) सिडकोतील रायगड चौकात हिरे शाळेच्या शिक्षिका टीमसमवेत परिसरात सर्वेक्षण करत असताना एका कुटुंबातील सदस्याला त्यांनी अनुक्रमे जात विचारली. परंतु, संबंधित कुटुंबातील सदस्याला जात विचारल्याने राग आला. आपण जात का विचारत आहात, असा सवाल करत त्या शिक्षिकेसह टीमला तिथून पळवून लावले. या वेळी काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

हिरे विद्यालयाच्या सर्वेक्षणकर्त्यांनी जात विचारली. आम्ही त्यांना विचारणा केली, परंतु त्यांना त्याबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. यामुळे आम्ही त्यांना हाकलून लावले. - योगेश गांगुर्डे, शहराध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा 

महापालिका शिक्षण विभागातर्फे सध्या शाळाबाह्य सर्वेक्षण सुरू आहे. याकरिता हिरे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या फॉर्ममध्येच जात विचारणे अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांना राग येण्याचे काही कारण नाही. 
- एम. एस. त्रिभुवन, मुख्याध्यापिका, लोकरत्न पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालय