जालना : लहान बहिणीपाठोपाठ मोठ्या बहिणीनेही सोडला प्राण

भोकरदन: पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे गुरुवारी (दि.२४) अचानक दोघी सख्ख्या बहिणींचे निधन झाले. लहान बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले. ही वार्ता मोठ्या बहिणीच्या कानावर पडताच ती देखील चक्कर येऊन खाली पडली. आणि त्यातच तिचे निधन झाले. या दुर्दैवी आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या सख्ख्या बहिणींची एकत्रच अंत्ययात्रा काढण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रभागा गंगाराम पैठणकर (वय ६५) व गुंफाबाई हरी वाघ (वय ६०) दोघी सख्ख्या बहिणी सोयगाव देवी (ता. भोकरदन) येथे आपापल्या कुटुंबासह राहतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे गुंफाबाई दूध घेऊन घरी आल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच भोकरदन व तिथून पुढे सिल्लोडला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले. या घटनेची खबर त्यांची मोठी बहीण चंद्रभागाबाई यांच्या कानावर पडली. बहिणीचे असे अचानक जाण्याचे दुःख त्यांना सहन झाले नाही. त्या नळावर पाणी भरत असतानाच त्यांनी हातातील हंडा खाली टाकला. त्या जागेवर कोसळल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

गावातून दोघींची एकत्रच अंतयात्रा काढण्यात येऊन दोघींच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघींच्या अचानक जाण्याने पैठणकर व वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रभागाबाई पैठणकर यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली तर गुंफाबाई वाघ यांच्या पश्चात पती, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

The post जालना : लहान बहिणीपाठोपाठ मोठ्या बहिणीनेही सोडला प्राण appeared first on पुढारी.