जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर दृष्टिबाधित युवकाची सायकलसफर; मुंबई-गोंदिया-मुंबई बारा दिवसांत

नाशिक : मुंबई ते गोंदिया आणि गोंदिया ते मुंबई हा २०१० किलोमीटरचा प्रवास १२ दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय अजयने बाळगले आहे.  गोदिंयाहून परतीचा प्रवास करतांना नाशिक येथे आला असता अजय ललवाणी या दृष्टिबाधित युवकाचा नाशिक सायकलिस्‍ट फाउंडेशनतर्फे सोमवारी (ता. १४) सत्‍कार केला. 

गेल्‍या ३ डिसेंबरला अजयने दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून सायकल सफर सुरू होती. रोज सुमारे १७० किलोमीटर सायकल चालविताना ९ तारखेला गोंदिया गाठले. तेथून पुन्हा त्याच मार्गाने परतीचा प्रवास करत असून, अजयसोबत दहा सहकारी आहेत. नाशिकला दाखल झाल्‍यानंतर मुंबई नाका येथे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे अजय व त्यांच्या सहकाऱ्यांचे औक्षण करून स्वागत केले. नाशिक सायकलिस्टचा टी-शर्ट, शाल-श्रीफळ, हार व मिशन फॉर हेल्थचे मेडल प्रदान करून अजयचा सत्कार केला. पुढील १८० किलोमीटर प्रवासासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सचिव डॉ. मनीषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, संजय पवार, सुरेश डोंगरे, ऐश्वर्या वाघ, वेदांत वाघ, संकेत भानोसे, संदीप भानोसे, अविनाश येवलेकर आदींसह इतर सायकलिस्ट उपस्थित होते. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्‍न 

दिव्यांग हे सामान्यांच्या तुलनेत कमी नाही हे अजयला दाखवून द्यायचे आहे. कोरोनामुळे, गेल्या आठ महिन्यांपासून सतत जाणवणारी भीती, चिंता यावर मात करून अजयने या मोहिमेचे धाडस केले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी अजय प्रयत्न करत आहे. अजय जन्मापासूनच दृष्टिबाधित आहे. विविध क्रीडा प्रकारांत यापूर्वीही त्‍याने प्रावीण्य मिळविलेले आहे. मुंबई येथे उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात तो नोकरीला आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांच्‍या जोरावर प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकते, असा विश्र्वास त्‍याने व्‍यक्‍त केला. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ