जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे

गौणखनिज www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गौण खनिज उत्खनन व त्याबद्दलचे कामकाज अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांच्याकडे सोपविण्यात आले असून, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तसे आदेश काढले आहेत. दरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये प्रशासकीय कारण देत जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून हे कामकाज काढून घेत स्वत:कडे घेतले होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तत्कालीन अपर जिल्हाधिकारी नडे यांनी नाशिक तालुक्यातील 21 खडीक्रशर सील करण्याचे आदेश काढले होते. हे आदेश काढल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी नडे यांच्याकडील गौण खनिजचे सर्व कामकाज काढून घेतले. हे काम काढून घेताना प्रशासकीय कारण पुढे करण्यात आले. दरम्यानच्या काळात खडीक्रशरवरून बरेच रणकंदन माजले. वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला. या वादावरील सुनावणीवरून प्रशासन आरोपींच्या पिंजर्‍यात उभे ठाकले होते. गौण खनिजचे कामकाज हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. 2021 च्या अखेरीस तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडील अधिकार काढून घेतले होते. त्यामुळे गौण खनिज अधिकारी यांच्याकडून ते प्रकरण अपर जिल्हाधिकार्‍यांकडे जायचे. नंतरच्या काळात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भीमराज दराडे यांच्याकडे काही काळ अधिकार देण्यात आले होेते. दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तब्बल 114 दिवसांनंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी नूतन अपर जिल्हाधिकारी पारधी यांच्याकडे पुन्हा गौण खनिजचे अधिकार देण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

हेही वाचा:

The post जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे appeared first on पुढारी.