जिल्हा परिषदेच्या बनावट नियुक्तिपत्राद्वारे फसवणूक; दोघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी 

जुने नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील पर्यवेक्षकपदासाठी लोकआयुक्तांच्या नावाने बनावट नियुक्तिपत्र दिल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना मंगळवार (ता. १५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दोघे अद्याप फरारी

या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी जिल्हा परिषद अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखनिक रवींद्र वाघ (वय ४८, रा. टागोरनगर) व बनावट ओळखपत्र छपाई करणारा अंकुश शांताराम कर्डिले (वय ३३, रा. शांतीनगर, पंचवटी) या दोघांना अटक केली आहे. मुख्य संशयित उमेश बबन उदावंत आणि नियुक्तिपत्रावर सही करणारा, असे दोघे अद्याप फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमका प्रकार काय घडला?

शिवाजीनगर, जेल रोड येथील हितेंद्र मनोहर नायक हे गेल्या ४ डिसेंबरला जिल्हा परिषद आरोग्य विभागात पर्यवेक्षकपदावर रुजू होण्यासाठी आले. त्यांच्याकडे नियुक्तीबाबतचे कक्ष अधिकारी सुभाष मोरे यांच्या सहीचे लोकआयुक्तांचे पत्र होते. थेटे यांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, नायक यांनी ओळखपत्रदेखील दाखविले. त्यावर राजमुद्रा, महाराष्ट्र शासन नाव, जिल्हा परिषद, तसेच नायक हितेंद्र मनोहर, पद- आरोग्य पर्यवेक्षक, असा मजकूर होता. त्याखाली कर्मचारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांची संगणकावर स्कॅन केलेली सही होती. 
दरम्यान, नायक यांच्याकडे नियुक्तीपूर्वी ओळखपत्र कसे आले? जिल्हा परिषदेत सरळसेवेने पर्यवेक्षकपदाची कुठलीही भरती या वर्षात झाली नाही, जिल्हा परिषद आणि लोकआयुक्त कार्यालयाचा पदभरती नियुक्ती आदेश करण्याचा काही एक संबंध नाही. त्यामुळे दोन्ही कागदपत्र बनावट असल्याचा संशय आल्याने अधिक चौकशीत संशयित उमेश उदावंत याने नियुक्तिपत्र आणि ओळखपत्र दिल्याचे समजले. त्याच्याकडेही जिल्हा परिषद कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र असल्याची माहिती समोर आली. त्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांची संगणक स्कॅन सही आढळून आली. दोघांचे ओळखपत्र, लोकआयुक्तांचे आदेशाचे पत्र यांसह अन्य कागदपत्र थेटे यांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

एक लाख ११ हजार ६०० रुपयांची फसवणूक

जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांच्या समोर उपस्थित केले. ७ डिसेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासमोर प्रकरण आले. त्यांनी श्री. नायक यांची चौकशी केली असता, हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याची खात्री झाली. त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, नायक यांच्या पत्नीलाही बनावट नियुक्ती आदेश दिल्याचे, तसेच सागर समाधान मोहिते आणि सचिन भास्कर चंद्रमोरे यांचीही फसवणूक करून उदावंत याने या तिघांकडून सुमारे एक लाख ११ हजार ६०० रुपये घेतल्याचे संबंधितांनी पोलिसांना सांगितले. 

जिल्हा परिषदेत साखळीची शक्यता 

या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील कनिष्ठ कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. मात्र, लोकआयुक्तांच्या नावाने पत्र तयार करणे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणक स्कॅन सही असलेले बनावट ओळख पत्र तयार करणे, यावरून हे काम कनिष्ठ कर्मचाऱ्याचे असू शकत नाही. त्यामुळे एक मोठी साखळी यामागे सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा