जिल्हा परिषदेत बनावट नियुक्तिपत्र प्रकरण : मुख्य संशयित गजाआड; चौकशीत आणखी काही नावे निष्पन्न

नाशिक : जिल्हा परिषदेत बनावट नियुक्तिपत्र प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मुख्य संशयितास मंगळवारी (ता. १५) सापळा रचून ताब्यात घेतले. आतापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात जिल्हा परिषद कर्मचारी असणाऱ्या एकाचा सहभाग आहे. त्याच्या चौकशीत आणखी काही नावे समोर आली आहेत. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

जिल्हा परिषदेत बनावट नियुक्तिपत्र प्रकरणी मुख्य संशयित गजाआड 
शिवाजीनगर, जेल रोड येथील हितेंद्र नायक ४ डिसेंबरला जिल्हा परिषद आरोग्य विभागात पर्यवेक्षकपदावर रुजू होण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे नियुक्त बाबतीचे कक्ष अधिकारी सुभाष मोरे यांच्या स्वाक्षरीचे लोकायुक्तांचे पत्र होते. विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे यांनी केलेल्या चौकशीत बनावट प्रकरण असल्याचे उघड झाले. लोकायुक्तांच्या नावाने असलेले बनावट नियुक्तिपत्र, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते आणि एस. भुवनेश्‍वरी यांच्या संगणकीकृत सहीचे बनावट ओळखपत्रासह अन्य कागदपत्रे त्यांनी ताब्यात घेतली. जिल्हा आरोग्याधिकारी कपिल आहेर यांच्यासमोर हजर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यापुढे सोमवारी (ता. ८) प्रकरण आले. त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार थेटे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी (ता. १०) भद्रकाली पोलिसांत गुन्हा करण्यात आला.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

कायदेशीर कारवाईचे आदेश

गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांनी जिल्हा परिषदेतील अर्थ विभागात सहाय्यक कनिष्ठ लेखनिक पदावर कार्यरत असलेला कर्मचारी रवींद्र वाघ (वय ४८, रा. टागोरनगर) तसेच बनावट ओळखपत्राची छपाई करणारा अंकुश कर्डिले (३३, रा. पंचवटी) याला ताब्यात घेतले. मुख्य संशयित उमेश बबन उदावंत (रा. नारायणबापूनगर, नाशिक रोड) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ४ डिसेंबरपासून तो फरारी होता. त्याचा मोबाईलदेखील बंद असल्याने पोलिसांना अडचण येत होती. मंगळवारी (ता. १५) संशयित उदावंत त्याच्या सहकाऱ्यास भेटण्यासाठी जय भवानी रोड, नाशिक रोड येथे येत आहे, अशी माहिती वऱ्हाडे यांना मिळाली.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता

त्यानुसार त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास त्या ठिकाणी सापळा लावला. साडेतीनला त्यास ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच काही नावेही सांगितली. ज्या संशयितांची नावे पुढे आली आहेत, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यांना अटक केल्यानंतर आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.