जिल्हा परिषद बनावट नियुक्ती प्रकरण : शंभर पानी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल   

नाशिक : जिल्हा परिषद बनावट नियुक्ती प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (ता. ६) शंभर पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणात दोन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह निवृत्त महिला कर्मचारी आणि अन्य चार, असे सात संशयितांवर दोष निश्‍चित करण्यात आला आहे. 

न्यायालयीन कोठडी मिळाल्याने मध्यवर्ती कारागृहात रवानगी
४ डिसेंबरला जिल्हा परिषदेत बनावट नियुक्ती प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी १० डिसेंबरला भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी रवींद्र वाघ, बनावट ओळखपत्र छपाई करणारा अंकुश कर्डिले, अधिकाऱ्यांची सही करणारा संतोष जाधव, मुख्य संशयित उमेश उदावंत या चौघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत जिल्हा परिषदेत सेवेतून काही दिवसांपूर्वी निवृत्त झालेली मंगला सरोदे आणि सध्या कार्यरत असलेली दीपांजली देशमुख यांचे नाव समोर आले होते. तपासी अधिकाऱ्यांनी २५ जानेवारीस दीपांजली, तर २९ जानेवारीस मंगला यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर सर्वांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

शंभर पानी दोषारोपपत्र
दरम्यान, नियुक्तिपत्रांची छपाई करणारा अनिल वारुंगसे (वय ४०, रा. उपनगर) अशा सातव्या संशयिताचे नावही निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन संगणक, दोन प्रिंटर, बनावट नियुक्तिपत्र व ओळखपत्र जप्त केले आहे. संगणकमधील माहिती, संशयिताच्या चौकशीत उघड झालेली माहिती, तक्रारदारांनी दिलेली माहिती अशा सर्व बाबी तपासून वऱ्हाडे यांनी शंभर पानी दोषारोपपत्र तयार केले. सात संशयितांनी संगनमत करून गुन्हा केल्याचे दोषापत्रात नमूद केले आहे. या प्रकरणात अन्य कुणी तक्रारदार असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन वऱ्हाडे यांनी केले आहे.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच