जिल्हा परिषद : मिनी मंत्रालयाचे प्रशासकीय कामकाज तळमजल्यावरून?

जिल्हा परिषद नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आमिशा मित्तल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यांचे दौरे केले. त्यानंतर त्यांनी आता मुख्यालयाबाबत अजेंडा ठरवत व्यापक स्वरूपात बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पहिल्या मजल्यावर असलेले दालन तळमजल्यावर आणणे तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या मोकळ्या वायर्स बंदिस्त करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, तळमजल्यावर दालन तयार करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याची चाचपणी बांधकाम विभाग करत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे सध्याचे दालन हे पहिल्या मजल्यावर आहे. कोणताही नवीन अधिकारी बदलून आल्यानंतर आपल्या दालनात बदल करण्याबाबत आग्रही असतो. जि.प.मध्ये बदली होऊन आलेल्या मित्तल यांनीदेखील आपल्या दालनाबाबत विचार करत असल्याचे समजते. जिल्हा परिषदेत येणारे वृद्ध, दिव्यांग तसेच इतर अभ्यागतांना अधिकाऱ्यांची भेट घेणे सोयीेचे व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे. तळमजल्यावर सध्या प्रवेशद्वाराजवळ सामान्य प्रशासन विभाग आहे. तसेच उजव्या बाजूला संग्रामचे कार्यालय आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन आहे. या दालनाचा वापर केला जाणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात आहे. बांधकाम विभागाने सुचविल्यानंतर यासाठीचे कामकाज होणार आहे. मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या वायर्सबाबत त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या असल्याचे समजते. जिल्हा परिषदेत येणारा वर्ग हा प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेला असतो. तसेच ठेकेदार वर्ग, दिव्यांग, वृद्ध यांचादेखील राबता जिल्हा परिषदेत असतो. त्यांच्यासमोर मुख्यालयाचे चित्र चांगले गेले पाहिजे, असादेखील विचार त्यामागे असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:

The post जिल्हा परिषद : मिनी मंत्रालयाचे प्रशासकीय कामकाज तळमजल्यावरून? appeared first on पुढारी.