Site icon

जिल्हा पुरवठा विभाग : लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी ‘रेशन पॅकेज’ मिळणे धूसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी चार वस्तूंचे पॅकेज 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली आहे. परंतु, जिल्ह्यासाठी आतापर्यंत तेलच उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पॅकेज मिळण्याची शक्यता धूसर आहे.

गोरगरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने प्रत्येकी एक किलो साखर, रवा, तेल आणि चणाडाळ अशा चार वस्तूंचे पॅकेज 100 रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 7.5 कोटी रेशनकार्डधारक कुटुंबांना या पॅकेजचा लाभ होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील अंतोदय आणि प्राधान्याचे सात लाख 93 हजार 591 रेशनकार्डधारक कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंद पसरला आहे. दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना राज्यस्तरावरून जिल्ह्याकरिता केवळ तेल मिळाले आहेत. दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या घरात रेशन पॅकेज पोहोचविण्यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील असून, राज्यस्तरावर तसा दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे. पण, अद्यापही तीन वस्तू उपलब्ध झालेल्या नाहीत. येत्या दोन दिवसांमध्ये या वस्तू मिळण्याची शक्यता वर्तविली जातेय. मात्र, तसे असले तरी जिल्ह्यातील लाभार्थी संख्या दिवाळीसाठी उरलेला कमी कालावधी बघता गोरगरिबांच्या हाती वेळेत हे पॅकेज पडणे मुश्किल वाटते आहे.

हेही वाचा:

The post जिल्हा पुरवठा विभाग : लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी ‘रेशन पॅकेज’ मिळणे धूसर appeared first on पुढारी.

Exit mobile version