जिल्हा बँकेसह दीड हजारांवर संस्थाच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक! 

येवला (जि. नाशिक) : जिल्हा बँक, मर्चंट बँक, पतसंस्था, बाजार समित्या, सोसायटीसह तब्बल १ हजार ८०० मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तब्बल पाचव्यांदा स्थगिती देण्याची वेळ आली आहे. आहे त्याच टप्प्यावर स्थगिती देण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. 

निवडणूक केव्हा होणार?

ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर सहकाराच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जानेवारी २०२० मध्ये काही ठराव जमा केले आहेत. तर राहिलेल्या ठरावांना १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिल्याने राजकीय वातावरण तापले होते. बँकेच्या निवडणुकीसाठी ५ एप्रिल रोजी मतदार यादीही प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, पुन्हा एकदा निवडणुकांना स्थगिती मिळाल्याने मतदार यादीसह जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रमदेखील पुढे ढकलला गेला आहे. किंबहुना मे महिन्यात निवडणुकीची शक्यता होती. पण, आता निवडणूक होणार की नाही, याचे उत्तर कुणाकडेच नाही. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा स्थगिती उठवली व पुन्हा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था, २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका मात्र होणार आहे. पण, त्यासाठी नियमावली केली जाणार आहे. 

मुदतवाढीचा रंगला खेळ! 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच निवडणुकांचा खेळ झाला आहे. मात्र, त्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २०२० मध्ये मार्चअखेरीस या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा ३० जून, दुसऱ्यांदा ३० सप्टेंबर, तिसऱ्यांदा ३१ डिसेंबर तर १६ जानेवारी रोजी चौथ्यांदा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, रुग्ण संख्या कमी झाल्याने व ग्रामपंचायतीच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्यावर चौथी मुदतवाढ चारच दिवसांनी २० जानेवारी २०२१ ला मागे घेत निवडणुका घेण्याचा नवा आदेश काढला होता. अचानकपणे रुग्ण संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत आहे त्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे बाजार समित्यांसह अनेक संस्थांना मुदतवाढ मिळाली असून, काही संस्थांवर प्रशासक आले आहेत. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!