जिल्हा रुग्णालयात रेमडेसिव्हिरचा तुटवडा; नाशिकसाठी ठाण्याहून पुरवठा 

नाशिक :  शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असताना जिल्हा रुग्णालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा संपल्याने महापालिकेने तातडीने एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन ठाणे जिल्हा रुग्णालयाकडून मागविली आहेत. 

स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (ता. ११) औषधे खरेदीच्या विषयाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. त्या पार्श्‍वभूमीवर औषधांसंदर्भात माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा संपला असून, जिल्हा रुग्णालयाकडे मागणी केल्यानंतरही तेथेही हीच परिस्थिती असल्याने ठाणे जिल्हा रुग्णालयाकडून एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा मागविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शनिवारपर्यंत औषधे शहरात पोचतील. नगरसेवक राहुल दिवे यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

इंजेक्शनचा पुरवठा संपणे गंभीर

बिटको रुग्णालयात नगरसेवक संतोष साळवे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिले जात नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे समोर आले. हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सूतोवाच करण्यात आल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून तयारी सुरू आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा संपल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांच्या अधिकारात मोठ्या प्रमाणात औषध खरेदी करण्यात आली. परंतु आयुक्तांना २५ लाख रुपयांपर्यंतच खरेदीचे अधिकार असल्याने स्थायी समितीने ठराव दप्तरी दाखल केला होता. त्यामुळे अडचणीत वाढ झाली होती. शुक्रवारी औषध खरेदीच्या कार्योत्तर मंजुरीला मान्यता देण्यात आली. 
 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण