जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारीला होणार मतदान  

येवला (नाशिक)  : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवार पासून प्रक्रिया सुरू होणार असून १५ जानेवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीची यात निवडणूक होणार असून राजकीय फड रंगू लागला आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रत्येक तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक या वर्षभरात होणार आहे. यासाठी प्रभाग रचना तसेच मतदार यादी सोमवार ता. १४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्या अगोदरच गावांमध्ये निवडणुकीचे वातावरण तप्त झाले आहे.

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

गावोगावी राजकारणाचे फड 

तालुक्यातील या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. आज निवडणुकीचा कार्यक्रम प्रत्यक्षात जाहीर झाल्याने आता गावोगावी राजकीय वातवरण तप्त होण्याबरोबरच गटबाजी अन भाऊकीचे राजकारण देखील तापणार आहे.अनेकांनी महिना-दोन महिने पासुनच फिल्डिंग लावून वार्ड, पॅनल ठरविले आहेत. नेत्यांनी देखील पॅनल निर्मितीचा आराखडा कागदावर करून ठेवला असून आता लवकरच पॅनल व उमेदवार ठरणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम..

-तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे -१५ डिसेंबर
-नामनिर्देशनपत्रे मागविणे व भरण्याचा दिनांक – २३ ते ३० डिसेंबर
-नामनिर्देशन पत्रांची छाननी – ३१ डिसेंबर
-नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक - ४ जानेवारी
-निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध - ४ जानेवारी
-मतदानाचा दिनांक – १५ जानेवारी (शुक्रवार)
- मतमोजणी – १८ जानेवारी

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO