जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या ४ लाख चाचण्या; एकुण बाधित १ लाख ४ हजार ७९७

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्‍ण २९ मार्चला आढळल्‍यानंतर स्‍वॅब चाचण्यांची गती वाढविण्यात आली होती. शुक्रवारी (ता. ११) जिल्ह्यातील स्‍वॅब चाचण्यांची संख्या चार लाखांपेक्षा जास्त झाली आहे. या तपासण्यांमध्ये १ लाख ४ हजार ७९७ बाधित आढळले असून, २ लाख ९३ हजार ९८४ रूग्‍णांचे अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत ९९ हजार ४०६ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ४८६ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरवात होताच आढळलेल्‍या कोरोना बाधिताच्‍या कुटुंबातील सदस्‍य व संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या चाचण्या केल्‍या जात होत्‍या. यानंतरच्‍या टप्यांत रूग्‍णसंख्या वाढू लागल्‍याने, रूग्‍णालयांत दाखल होणाऱ्या संशयितांच्‍याही चाचण्या केल्‍या जात होत्‍या. पहिल्‍या एक लाख चाचण्यांमध्ये पॉझिटीव्‍ह रूग्णसंख्येचा दर २४.८९ टक्‍के होता. दोन लाख चाचण्या झाल्‍यावर हा दर २७.८९ टक्‍यांवर, तर तीन लाख चाचण्या पूर्ण होत असताना हा दर २८.५३ टक्‍यांवर पोचला होता. यात किरकोळ घट झाली असून, चार लाख चाचण्या पूर्ण होताना रूग्णसंख्येचा दर २६.१८ टक्‍के इतका आहे. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

चाचण्यांची गती मंदावली 

पहिले एक लाख चाचण्या होण्यासाठी तब्‍बल १४२ दिवस कालावधी लागला होता. परंतु या दरम्‍यान जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव जलद गतीने होत असल्‍याने दोन लाख व तीन लाख चाचण्या होण्यासाठी अनुक्रमे २९ आणि २७ दिवसांचा कालावधी लागला. तीन लाखनंतर पुढील एक लाख चाचण्यांसह चार लाखांचा टप्पा गाठण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागला आहे. 

दिवसभरात २६२ बाधित, जिल्ह्यात ६ रूग्‍णांचा मृत्‍यू 

शुक्रवारी (ता. ११) दिवसभरात २६२ रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले असून, जिल्ह्यात सहा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या २२० आहे. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्णसंख्येत ३६ ने वाढ झाली असून, सद्यस्‍थितीत जिल्ह्यात ३ हजार ५३८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १९१, नाशिक ग्रामीणमधील ६५, मालेगावचे दोन आणि जिल्‍हाबाहेरील चार रूग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १२६, नाशिक ग्रामीणमधील ७९, मालेगावचे पाच तर, जिल्‍हाबाहेरील दहा रूग्‍ण आहेत. सहा मृतांमध्ये शहरातील दोन तर, ग्रामीणमधील चार रूग्‍ण आहेत. दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७२३, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २०, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन, जिल्‍हा रूग्‍णालयात सात रूग्‍ण दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या १ लाख ४ हजार ८९६ झाली असून, यापैकी ९९ हजार ४०६ रूग्‍ण बरे झाले आहेत. १ हजार ८५२ रूग्‍णांचा आतापर्यंत मृत्‍यू झाला आहे. १ हजार ४८६ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे महत्त्वाचे टप्पे- 
१ लाख तपासण्या---------१७ ऑगस्‍ट 
२ लाख चाचण्या----------१५ सप्‍टेंबर 
३ लाख चाचण्या----------१२ ऑक्‍टोबर 
४ लाख चाचण्या----------११ डिसेंबर