जिल्ह्यात आरटीई नोंदणीला शाळांचा मिळेना प्रतिसाद; प्रवेशासाठी ४ हजार ५४० जागा उपलब्‍ध

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांत मोफत प्रवेश दिला जातो. या अंतर्गत शाळांना त्‍यांच्‍याकडील उपलब्‍ध २५ टक्‍के जागांचा तपशील नोंदविण्यासाठी शिक्षण विभागाने दोनदा मुदतवाढ दिली होती. तरीदेखील गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा नोंदविलेल्‍या जागांची संख्या कमीच आहे. जिल्ह्यात ४४९ शाळांनी नोंदणी करत चार हजार ५४० जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशासाठीच्‍या प्रक्रियेतील पहिल्‍या टप्प्‍यात शाळांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची होती. मात्र शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्‍याने पहिल्‍यांदा १० फेब्रुवारीपर्यंत व दुसऱ्यांदा सोमवार (ता. १५)पर्यंत मुदतवाढ देऊन शाळांना नोंदणी प्रक्रिया राबविण्याचे आवाहन केले होते. दरम्‍यान, गेल्‍या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ४४७ शाळांमधील पाच हजार ३०७ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध केल्‍या होत्या. यातून सुमारे पावणेचार हजार जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले होते. तर सुमारे दीड हजार जागा रिक्त होत्या. मात्र, यंदा जिल्ह्यातील ४४९ शाळांनी नोंदणी करून चार हजार ५४० जागा उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. राज्‍याचा विचार करता आतापर्यंत एकूण आठ हजार ९३५ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांकडून ९३ हजार ९९ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध असणार आहेत. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

पालकांना प्रतीक्षा वेळापत्रकाची 
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे प्रवेश वेळापत्रक कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे कोलमडले होते. सध्या परिस्‍थिती पूर्वपदावर येत असली तरी गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळापत्रक प्रभावित व्‍हायला नको, अशी अपेक्षा पालक वर्गाकडून व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे लवकरात लवकर वेळापत्रक जारी करत प्रवेश प्रक्रियेला गती देण्याची मागणी होत आहे.  

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार