जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्याने पाणीवापर वाढला; धरणांतील जलसाठ्यात मोठी घट

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांची ओंजळ काठोकाठ भरूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील एकूण धरणांतील साठ्यात आठ ते नऊ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये ६७ टक्के साठा होता. आता मार्च २०२१ अखेर हाच जलसाठा ५६ ते ५८ टक्क्यांवर आला आहे. दारणा धरणात ६१ टक्के, मुकणे धरणात ६४ टक्के, तर भावली धरणात ९१ टक्के साठा शिल्लक आहे. 

तालुक्यातील मुकणे, दारणा, वैतरणा, वालदेवी, कडवा, भावली, वाकी, खापरी ही प्रमुख जलसाठ्याची धरणे आहेत, तर लघुपाट बंधाऱ्यांमध्ये वाडीवऱ्हे, तळोशी, खेड, त्रिंगलवाडी, शेनवड यांचा समावेश आहे. या छोट्या पाटबंधाऱ्यांचा वापर परिसरातील गावांसाठी होतो, तर मोठ्या धरणांचे पाणी राज्याच्या विविध भागांत जाते. यामध्ये दारणाचे पाणी मराठवाड्यासाठी, तर वैतरणाचे पाणी मुंबईसाठी रवाना केले जाते. बरेचसे पाणी पुन्हा आरक्षित केले जाते. आजमितीस मुकणे धरणात ६४ टक्के वालदेवी, ८५ टक्के आणि दारणा धरणात ६१ टक्के भावली धरणात ९१ टक्के तर कडवामध्ये २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

जिल्ह्यात मध्यम प्रकारातील १७, तर सात मोठी अशी एकूण २४ धरणे आहेत. मार्च २०२० च्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये जिल्ह्यातील मोठ्या सात धरणांपैकी केवळ मुकणेचा अपवाद वगळता गंगापूर, करंजवण, दारणा, कडवा, चणकापूर आणि गिरणा या सहा मोठ्या धरणांतील साठ्यात मोठी घट आली आहे. याबरोबरच मध्यम १७ प्रकल्पांपैकी पालखेड, वालदेवी आणि भोजापूर या केवळ तीन प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा काही प्रमाणात जास्त शिल्लक आहे. 
 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

धरणनिहाय उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारीत ) 
दारणा- ६१, भावली- ९१, मुकणे- ६४, वालदेवी- ८५, कडवा- २७, गंगापूर- ५०, कश्यपी- ७१, गौतमी गोदावरी- ३२, गिरणा- ४९, आळंदी- ५८, ओझरखेड- ६०, नाग्या-साक्या- ३८, पालखेड- ७३, करंजवण- ४३, पुणेगाव- ४४, वाघाड- २७, तीसगाव- ४६, पुनंद- ८३, पुणेगाव- ४४, चणकापूर- ५९, नांदूरमध्यमेश्वर- ९५, भोजापूर- ४२, हरणबारी- ५७, केळझर- ४१, माणिकपुंज- १४.