जिल्ह्यात उपचार घेताहेत आठ हजारांवर रुग्ण; दिवसभरात १३५६ बाधित

नाशिक : जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या खालावत एक हजारांपर्यंत आलेली असताना, गेल्‍या महिन्‍याभरापासून यात सातत्‍याने वाढ होते आहे. रविवारी (ता. १४) जिल्ह्यात एक हजार ३५६ कोरोनाबाधित आढळले असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ५२३ राहिली. दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत तब्‍बल ८३१ ने वाढ झाली असून, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आठ हजारांहून अधिक झाली आहे. 

सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात आठ हजार ४८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या सहा हजार १९० असून, नाशिक ग्रामीणमध्ये एक हजार २२४ बाधितांवर, मालेगाव महापालिका हद्दीत ५७८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याबाहेरील ५६ रुग्‍णदेखील नाशिकमध्ये उपचार घेत आहेत. रविवारी नाशिक शहरातील सर्वाधिक ९४२, नाशिक ग्रामीणमधील २६९, मालेगावचे १२६, तर जिल्ह्याबाहेरील १९ बाधित आढळून आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २४२, नाशिक ग्रामीणमधील १८३, मालेगावचे ७८, तर जिल्ह्याबाहेरील वीस रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. लॅम रोड, नाशिक रोड येथील ६२ वर्षीय महिला व दिंडोरी तालुक्‍यातील खेडगाव येथील ८५ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ६३१ संशयित दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील एक हजार ५६४ संशयित असून, जिल्‍हा रुग्‍णालयात दहा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्ण दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ४९४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ३३ हजार ५९० झाली असून, यापैकी एक लाख २३ हजार ३७३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वि‍रीत्‍या मात केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन हजार १७० बाधितांचा मृत्‍यू झाला आहे

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू