जिल्ह्यात काही दिवस असेच ढगाळ वातावरण; शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण

नाशिक : शुक्रवारी झालेला रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडली आहे. या पावसाने करपा, भुरी व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून, शेतकऱ्यांना औषध फवारणीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आजच्या पावसाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. 

अभोण्यात रिमझिम पाऊस 

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ११) दिवसभर ढगाळ वातावरणासह नाशिक शहर व तालुक्यासह जिल्ह्यातील येवला, निफाड, कळवण, बागलाण, मालेगाव, सिन्नर, देवळा, सुरगाणा आदींसह सर्व तालुक्यांमध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. परिसरात शुक्रवारी (ता. ११) सकाळपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडला. पावसामुळे कांदालागवडीसाठी तयार असलेली रोपे व नवीन लागवड करण्यात आलेले कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. अवकाळी पावसाने करपा, भुरी व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आजच्या अवकाळी पावसाने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त बुरशीनाशकांच्या फवारणी खर्चाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. ढगाळ वातावरणात व तुरळक अवकाळी पावसातही काही ठिकाणी नवीन कांदालागवडीची लगबग मात्र सुरूच आहे. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

तळवाडे दिगर परिसरात पावसाच्या हलक्या सरी 
तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील तळवाडे दिगरसह परिसरातील पंचक्रोशीत गावात शुक्रवारी (ता. ११) दिवसभर ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे काढणीला आलेला पावसाळी कांदा व लागवडीयोग्य कांदारोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, त्याचप्रमाणे काढणीला आलेले द्राक्ष व भाजीपाला पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे कांदारोपाचे मोठे नुकसान होणार असून, या पावसामुळे धुक्याचे, दवबिंदूंचे प्रमाण वाढणार आहे. काकडी, कोबी, टोमॅटो, मिरची या भाजीपाला पिकांची परिसरात मोठ्या प्रमणात लगवड झालेली असून, त्यांनादेखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून फवारणीच्या खर्चात वाढ होणार आहे. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

काही दिवस ढगाळ वातावरण 
जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केल्याचा संदेश सोशल मीडियावर येत असल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या आठवड्यात पीक वाचविण्यासाठी फवारणी सुरू करून पुढील नियोजन शेतकरी करत आहेत.