जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच! सलग दुसऱ्या दिवशी हजाराहून अधिक बाधित 

नाशिक : गेल्‍या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा ओलांडला असल्‍याने उपचार घेणाऱ्या बाधितांच्‍या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ११) दिवसभरात एक हजार १४० पॉझिटिव्‍ह आढळले, तर बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या सहाशे होती. तीन बाधितांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ५३७ ने वाढ झाली असून, यामुळे उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या सहा हजारांच्‍या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. सध्या जिल्ह्यात पाच हजार ७०८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

गुरुवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील ७७३, नाशिक ग्रामीणमधील २६०, मालेगावचे ९२, तर जिल्ह्याबाहेरील पंधरा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २८६, नाशिक ग्रामीणमधील १७८, मालेगावचे १२४, तर जिल्‍ह्याबाहेरील १२ असे एकूण ६०० रुग्‍णांनी दिवसभरात कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. तीन मृतांमध्ये नाशिक शहरातील एक, तर नाशिक ग्रामीणमधील दोन बाधितांचा मृत्‍यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ८२४ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

दिवसभरात जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ५४० संशयित दाखल झाले. यापैकी तब्‍बल एक हजार ४७५ रुग्‍ण नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात ८, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ८ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख २९ हजार ५७७ वर पोचली असून, यांपैकी एक लाख २१ हजार ७११ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आतापर्यंत दोन हजार १५८ बाधितांचा जिल्ह्यात मृत्‍यू झाला आहे.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO