जिल्ह्यात कोरोनाचे दोन लाख बाधित; एक लाख ६९ हजार ७७६ रुग्‍णांची कोरोनावर मात

नाशिक : अत्‍यंत आव्‍हानात्‍मक राहिलेल्‍या २०२० या वर्षातील अंतीम तिमाही अन्‌ नववर्षातील सुरवातीचे दोन महिने कोरोनाच्‍या प्रादुर्भावाच्‍या दृष्टीने दिलासादायक राहिले. परंतु मार्चमध्ये झालेल्‍या विक्रमी वाढीमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी (ता.५) दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात दोन लाख तीन हजार २६ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी तब्‍बल एक लाख ३४ हजार ५२१ पॉझिटिव्‍ह हे २६ ते ६० वयोगटातील आहेत. एक लाख ६९ हजार ७७६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. दोन हजार ४९७ बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला असून, ३० हजार ७५३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

गेल्‍या २७ नोव्‍हेंबरला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा गाठला होता. परंतु त्‍यानंतर डिसेंबर व जानेवारीत जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली होती. परंतु फेब्रुवारीच्या उत्तरार्धात रुग्‍णसंख्येत वाढ होत गेली. रुग्‍णसंख्या वाढीचा आलेख मार्चमध्येही वाढतच गेला. २७ नोव्‍हेंबरनंतर आजपर्यंत वाढलेल्‍या एक लाख रुग्‍णांमध्ये मार्चमधील सर्वाधिक ५८ हजार ७१२ बाधितांचा समावेश आहे. एप्रिलच्या पहिल्‍या पाच दिवसांत आत्तापर्यंत २१ हजार ५०४ कोरोनाबाधित आढळून आले. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

आठ दिवसांत एक लाख चाचण्या 

कोरोनाबाधितांच्‍या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, जिल्ह्यात होणाऱ्या स्‍वॅब चाचण्यांच्‍या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चाचण्यांच्‍या संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्‍या २८ मार्चला जिल्ह्यात सात लाख चाचण्या झालेल्या असताना अवघ्या आठ दिवसांत ही संख्या आठ लाखांच्‍या पार पोचली आहे. यापूर्वी सहा लाख ते सात लाख अशा एक लाख चाचण्यांकरिता दहा दिवसांचा कालावधी लागला होता. त्‍यापेक्षाही कमी आठ दिवस कालावधीची नोंद झाली आहे. दरम्‍यान, आत्तापर्यंत झालेल्‍या आठ लाख दोन हजार २६४ चाचण्यांपैकी पाच लाख ९४ हजार ७३ रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. दोन लाख तीन हजार २६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार १६५ अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

वयोगटनिहाय (महिला‍ -पुरुष) आढळलेले बाधित 
वयोगट महिला पुरुष एकूण 

०-१२ ५,४८३ ४,२१२ ९,६९५ 
१३-२५ १७,१८० १२,२६८ २९,४४८ 
२६-४० ४२,४०१ २४,७४७ ६७,१४८ 
४१-६० ४२,०६१ २५,३१२ ६७,३७३ 
६१ पेक्षा पुढे १७, ७७१ ११,५९१ २९,३६२