जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या पंचवीसशेच्‍या उंबरठ्यावर! दिवसभरात २५ मृत्‍यू

नाशिक : काही दिवसांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्‍या संख्येत झालेली लक्षणीय वाढ चिंता वाढविणारी आहे. सोमवारी (ता.५) जिल्ह्यात २५ बाधितांचा मृत्‍यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे गेलेल्‍या बळींची संख्या पंचवीसशेच्‍या उंबरठ्यावर असून, जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूचा आकडा दोन हजार ४९७ वर पोचला आहे. दिवसभरात चार हजार ६१९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत, तर चार हजार ३१३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. जिल्ह्यात सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या ३० हजार ७५३ झाली आहे. 

ग्रामीणमधील एक हजार १७

आत्तापर्यंत झालेल्‍या दोन हजार ४९७ मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार १९२, नाशिक ग्रामीणमधील एक हजार १७, मालेगावच्‍या २१३, तर जिल्‍हाबाहेरील ७५ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. सोमवारी झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक पंधरा, तर नाशिक ग्रामीणमधील आठ, जिल्‍हाबाहेरील दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. नाशिक शहरातील मृतांमध्ये पंचवटी, नाशिक रोड भागातील मृतांची संख्या अधिक आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सिन्नर तालुक्‍यातील तीन, चांदवड तालुक्‍यातील दोन, निफाड, नांदगाव व दिंडोरी तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) येथील ३३ वर्षीय तरुणासह ६६ वर्षीय पुरुष बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

बाधितांमध्ये महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक

दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक दोन हजार ५७२ पॉझिटिव्‍ह आले असून, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ८५४, मालेगावच्‍या १२३, तर जिल्‍हाबाहेरील सत्तर रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार ८०, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार १५३, मालेगावच्‍या २६, तर जिल्‍हाबाहेरील ५४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. 

पाच हजारांहून अधिक अहवाल प्रलंबित 

सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार १६५ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील तीन हजार ५३, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ७७७, मालेगावच्‍या ३३५ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. दिवसभरात आढळलेल्‍या संशयित रुग्‍णांच्‍या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात सहा हजार ९० रुग्‍ण दाखल झाले. यापैकी सर्वाधिक पाच हजार ७६९ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात १७, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ३८, नाशिक ग्रामीणमध्ये २१८, मालेगावला ४८ रुग्‍ण दाखल झाले आहेत.